पनवेल : खारघर येथील एका ३३ वर्षीय महिलेला सायबर क्राईम विभागातील पोलीस असल्याची बतावणी करुन फोनवर संपर्क साधून एक लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोदविला आहे.
बुधवारी (ता. २९) दुपारी तीन वाजता खारघर येथील सेक्टर ३४ ए येथील साईमन्नत सोसायटीत राहणाऱ्या महिलेला फोन आला. इंटरनॅशनल पार्सल आले असून एक क्रमांक प्रेस करा अशी माहिती त्या फोनवर देण्यात आली. त्यानंतर फिलेक्स नावाच्या व्यक्तीने संबंधित महिलेला इंटरनॅशनल पार्सलमध्ये अवैधरित्या पासपोर्ट, कागदपत्र, एम.डी पदार्थ आणि कपडे असल्याने हा फोन मुंबईच्या सायबर क्राईम पोलीस विभागात जोडून देत असल्याचे सांगितले. सायबर क्राईमच्या कथीत अधिकाऱ्याने संबंधित महिलेला तूमच्या आधारकार्डच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या ठिकाणी वापर केल्याचे सांगून अजून भिती घातली. अवैध संपत्ती मिळविण्यासाठी त्यांची बॅंक खाती वापरली जात असल्याची संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्याने ती महिला घाबरली. त्याच दरम्यान सायबर पोलिसांचे उपायुक्त यांच्याशी या महिलेचे बोलणे करुन देण्यात आले. या अधिकाऱ्यांनी या महिलेला स्काईपवरुन संपर्क करुन त्यांच्या बॅंक खात्याची रिर्झव्ह बॅंकेकडे पडताळणीसाठी बॅंकेचा तपशील मागवून घेतला.
हेही वाचा – पनवेल : सिडकोच्या जागेवर राडारोडा टाकणाऱ्यास अटक
हेही वाचा – नवी मुंबई : वंडर्स पार्कमधील प्रवेश महाग
पोलीस स्वत: चौकशी करत असल्याने महिलेने बॅंकेची माहिती दिली. त्यानंतर महिलेला १५ मिनिटांत तुमची रक्कम तुमच्या बॅंक खात्यात पुन्हा जमा होईल मात्र खात्री करण्यासाठी एका बँक खात्यावर ही रक्कम पाठविण्याची सूचना केली. त्याप्रमाणे महिलेने १ लाख ४७ हजार रुपये कथित पोलिसांच्या बॅंक खात्यात पाठविले. ही रक्कम या महिलेला न मिळाल्याने महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठले. या टोळीने महिलेला कर्जासाठी २५ लाख रुपयांचा ऑनलाईन अर्ज करायला सांगितला. तत्काळ त्यावर कर्जाचे २५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम महिलेला पुन्हा त्यांच्या बॅंक खात्यात वळते करण्यासाठी सांगितले. मात्र महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.