ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने आपला ओटीपी क्रमांक अनोळखी व्यक्तीला देऊ नये म्हणून पोलीस जनजागृती करीत असतात. मात्र ओटीपी न देताही एका महिलेची २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सायबर सेल तपास करीत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाचीच एक कोटी रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल
यातील फिर्यादी रिना पांडा या डोंबिवली येथे राहत असून नवी मुंबईतील वाशी येथे त्यांचा इंटेरीयल एक्सिबिशनचा व्यवसाय आहे. जुलै महिन्यात त्यांनी ऑनलाईन साईटवरून ८४० रुपयांचे काही कपडे मागवले होते. हे कपडे त्यांना मिळताच त्यांनी सबंधीत व्यक्तीला पैसेही दिले होते. मात्र, कपडे व्यवस्थित नसल्याने साईटवर जाऊन परत केले, व त्याची रोकड अजिओ या अँपवर जमा न करता बँक खात्यात जमा करण्यासबंधी त्यांनी मेल केला होता. मात्र पैसे न आल्याने त्यांनी थेट ग्राहकमंच (consumer court) कडे तक्रार केली. त्या नंतर ३ ऑक्टॉम्बरला ajio कंपनी ग्राहक सेवेकडून रोहित खना अशी स्वतःची ओळख करून देत एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी रुपये ८४० ची फसवणूक झाल्याची माहिती रिना यांनी दिली. त्यावेळी रोहित याने एक लिंक पाठवली व ती उघडण्यास सांगितली. मात्र रिना यांनी त्याला नकार दिला. शेवटी आयसीआयसीआयच्या अँप त्याने सांगितल्या प्रमाणे ओपन करून त्यातील कार्डलेस कॅश काढणे यावर जाऊन २०,००० rscrefund लिहून क्लिक केले.
काही वेळात रिना यांच्या खात्यातून २० हजाराची रक्कम अन्यत्र वळती झाली. याबाबत रोहित याला पुन्हा फोन करून विचारणा केली असता सिस्टीम प्रोब्लेम आहे थोड्या वेळात रक्कम तुमच्या खात्यात परत जमा होईल असे सांगितले मात्र त्या नंतर ना रक्कम जमा झाली ना रोहितने फोन उचलला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रोहित म्हणून नाव सांगणाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पूर्ण प्रक्रियेत फिर्यादीने ओटीपी क्रमांक दिला नसल्याचे ठाम सांगत असून तसे प्रथम संदर्भ अहवालात नमूदहि केलेले आहे. त्यामुळे आता ओटीपी न घेता कशी फसवणूक केली या बाबत सायबर सेल तपास करीत आहे.