नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली येथील एका मनोरुग्ण वृद्धाश्रमात झोपलेल्या अवस्थेत एका महिलेच्या डोक्यावर दुसरीने जेवणाचा ताट जोरजोरात मारून जखमी केले. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी मनोरुग्ण महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र मनोरुग्ण असल्याने अद्याप अटक केलेले नाही.
ऐरोली सेक्टर चार येथे असलेल्या रो हाऊसमध्ये स्वामी समर्थ सेवा संस्थेचा वृद्धाश्रम असून या ठिकाणी मनोरुग्णांची सोय केली जाते. एका खोलीत तीन ते चार महिलांची झोपण्याची व्यवस्था असते. त्यातील एका खोलीत ११ तारखेला अपरात्री दिड ते दोन वाजता एका ६५ वर्षीय वृद्धेने शेजारच्या पलंगावर झोपलेल्या दोन महिलांवर हल्ला केला. त्यातील एक महिला खोलीतीलच स्वच्छतागृहात पळून गेली व आतून दरवाजा लावून घेतला. मात्र दुसरी एक साठ वर्षीय महिला गाढ झोपेत असल्याने तिला काही कळण्याच्या आत आरोपी महिलेने तिच्या डोक्यात जेवणाचे ताट वारंवार मारून जखमी केलेच, शिवाय जोरात चावाही घेतला.
हेही वाचा – वंडर्स पार्कला तोबा गर्दी! ;परिसरात वाहतूककोंडी ,रविवारी ९८३९ नागरिकांची भेट
सकाळी साडेनऊच्या दरम्यान जेव्हा वृद्धाश्रम सेविका या खोलीत आल्या त्यावेळी हा प्रकार समोर आला. तसेच बाहेर कोणी अन्य आले आहे, हे लक्षात आल्यावर स्वच्छतागृहात लपलेली महिला बाहेर आली. तिने दिलेल्या माहितीवरूनच रात्री नेमके काय घडले हे समोर आले. जखमी महिलेस जेव्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा – उरण: वादळामुळे करंजा रो रो जेट्टीला दोन मालवाहू जहाजांची धडक; आपत्ती व्यवस्थापन बेपत्ता
ही घटना कळताच उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक आयुक्त डी. डी. टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. ढाकणे, पोलीस निरीक्षक बी.एन. औटी यांनी भेट दिली. आरोपी ही मनोरुग्ण असल्याने तिला अटक करण्यात आलेले नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही असले तरी बंद अवस्थेत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी. डी. औटी यांनी दिली.