नागरिकांची गैरसोय, तासनतास रांगा
नवी मुंबई : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नवी मुंबईत महापालिका विभाग कार्यालयात शासकीय आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र ती अडगळीत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली नाही. तर ज्येष्ठ, अपंग व गरोदर महिलांसाठी बसण्याची व्यवस्थाही नाही.
ही गैरसोय सूरू असताना येथील केंद्र चालकांकडून मिळत असलेली वागणूकही नीट नाही. त्यात वारंवार एकाच कामासाठी चकारा माराव्या लागत असून केद्र चलकांकडून अधिकच्या पैशांचीही मागणी केली जात आहे. यासाठीची कोणतीही अधिकृत पावतीही दिली जात नाही. कागदावर लिहून दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवीन आधार कार्ड काढणे, नावात बदल, नवीन पत्ता आदी विविध कारणांसाठी नागरिकांना या आधार केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. ही आधार केंदे नवी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन खुर्ची आणि संगणक प्रिंटरसाठी विद्युत व्यवस्था करून दिली असून त्यांना दिलेली जागा ही अडगळीत आहे. कोपरखैरणे विभाग कार्यालयात जिन्याखाली जागा दिली तर ऐरोलीत विभाग कार्यालयात पत्रा व पुठ्ठाच्या वापर करून एक अतिरिक्त खोली करण्यात आली आहे. वाशी येथील कार्यालय एक छोटय़ाशा जागेत सुरू असून त्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. केंद्रांसाठीच योग्य जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. बसण्यासाठी व्यवस्था नाही तर पिण्याच्या पाणीही मिळत नाही. पंखा नसल्याने बाहेरून आलेल्या नागिरकांना कधी एकदा या कोंडवाडय़ांतून बाहेर पडतो असे होते. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने रांगेत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. यात ज्येष्ठ नागिरक, अपंग व गरोदर महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घतलेले श्रीपाद लांडे यांनी सांगितले.
नेरूळ, बेलापूर, घणसोली येथील केंद्रांत त्या मानाने चांगली जागा आहे. मात्र कामासाठी विलंब होत असल्याने गैरसोय आहेत. ही केंद्रे पालिका विभाग कार्यालयाबरोबर पोस्ट कार्यालय, काही बँक आदी ठिकाणी सुरू करावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत. आम्ही कसेही काम करू मात्र नागरिकांसाठी सोय करणे आवश्यक आहे. हे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचे असले तरी नागरिक मात्र नवी मुंबई महापालिकेचे आहेत अशी माहिती एका केंद्र चालकाने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी विभागाने दिलेल्या निर्देशानुसार आपण प्रत्येक विभाग कार्यालयात सोय करून दिलेली आहे. नागरिकांची काय गैरसोय होते याबाबत आढावा घेऊन योग्य ती व्यवस्था करण्यात येईल.
– दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, महापालिका