पनवेल : महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी उष्माघाताने आतापर्यंत १४ जणांच्या मृत्यू प्रकरणी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन खारघर पोलिसांना दिल्याची माहिती आप पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी बुधवारी दिली.
बुधवारी दुपारी आपचे पदाधिकारी उष्माघाताच्या त्रासामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आले होते. यावेळी आपचे सचिव शिंदे यांनी आयोजकांच्या दुर्लक्षितपणामुळे ही घटना घडली असून, हवामान विभागाने उष्माघात होण्याची सूचना देऊनही सरकारने स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप केला.
हेही वाचा – अकोला: माजी सैनिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू; जमिनीच्या वादातून घडले हत्याकांड
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना बसण्यासाठी तारांकित सुविधा आणि श्री सदस्यांसाठी भर उनात मातीत बसण्याची सोय केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच सरकारने १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू उष्माघात व चेंगराचेंगरीच्या त्रासाने झाल्याची शक्यता येथे वर्तविली. २५ लाखांच्या पुरस्कारासाठी १४ कोटी रुपये खर्च केल्याने सरकारने यापुढे असे पुरस्कार सोहळे बंदिस्त जागेत करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली.