नवी मुंबई : नवी मुंबईत द्रुतगतीच्या तोडीस तोड असलेल्या पाम बीच मार्गावरून जाताना उंचावर ठेवण्यात आलेले चारचाकी वाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक महिने पडद्याखाली झाकून ठेवलेली अपघातग्रस्त गाडी सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. अपघात ग्रस्त असलेली छिन्नविछिन्न गाडी पाहून तरी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण नाही ठेवले, तर काय होईल याची कल्पना येईल. वेगावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपलीही अवस्था अशीच होईल जणू असा संदेशच ही गाडी वाहनचालकांना देत आहे. नवी मुंबई महापालिकेने अपघात रोखण्यासाठी ही अनोखी उपाययोजना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महानगरपालिका अनेक स्तुत्य उपक्रम राबवते. त्यात असेही उपक्रम असतात जे पालिका कामांशी निगडित नाहीत, मात्र नवी मुंबईकर नागरिकांच्या महत्त्वाची आहेत. नवी मुंबईत पाम बीच मार्गावर भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघात होतात, तर अनेकांचे आतापर्यंत जीवही गेले आहेत. याच मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी उपायोजना करण्यात आली आहे. नवी मुंबईतील पाम बीच हा मार्ग एखाद्या द्रुतगती मार्गाप्रमाणे असून वाशी ते बेलापूर असे सुमारे ९ किलोमीटरचे अंतर आहे. दुर्दैवाने या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, येथे होणारे जवळपास सर्व अपघात केवळ वेगावर नियंत्रण न राखल्याने, अतीवेगामुळे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी वेग नियंत्रण दर्शवणारी मोठमोठे इलेक्ट्रॉनिक फलक लावले. तसेच सीसीटीव्ही लावले. वेगवान मार्गावर नियमाप्रमाणे गतिरोधक लावता येत नसल्याने अपघात प्रवण क्षेत्र शोधून तेथे रम्बलर बसवण्यात आली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : होळीची वर्गणी कमी दिली म्हणून दोघांना जबर मारहाण; दुकानाचेही नुकसान

आता त्याहून अनोखा प्रयत्न केला असून या मार्गावरील वजरणी व आगरी कोळी चौकात एक अपघातग्रस्त गाडी उंचावर ठेवण्यात आली आहे. सर्व वाहन चालकांच्या नजरेस पडावी अशी ती ठेवण्यात आली आहे. अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेतील गाडी पाहून अपघात झाल्यास आपल्या गाडीचीही अशीच स्थिती होऊ शकते, असे लक्षात येते. निदान असे दृश्य पाहून तरी नागरिक गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवतील, अशी अपेक्षा आहे. ही गाडी सर्वांचे लक्ष वेधत आहे.

हेही वाचा – नवी मुंबईत युलू सायकलपेक्षा ई बाईकला अधिक पसंती; महापालिकेच्या गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणार २७४ युलू सायकल

वाहन चालकांनी या दुर्घटनाग्रस्त गाडीकडे पाहून वेगावर नियंत्रण ठेवावे हीच अपेक्षा आहे, असे नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई म्हणाले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident car in vajrani chowk is attracting people attention ssb