ऑक्टोपस झोपाळ्यातून ७ फुटांवरून कोसळून एक जखमी
वंडर्स पार्कमधील झोपाळ्यात बसलेली व्यक्ती ७ फुटांवरून कोसळून जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडल्याच्या पाश्र्वभूमीवर येथे येणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्यक्तीला तिथे प्रथमोपचारही मिळू शकले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
वंडर्स पार्कमधील ऑक्टोपसचा झोपाळा २५ फुटांच्या परिघात फिरतो. त्यात बसलेल्या व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याप्रमाणे झटका बसला आणि ते सात फुटांवरून खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. त्यांच्या हाताला जखम झाली, मात्र त्यांना तिथे प्रथमोपचारही मिळाले नाहीत.
दर्जेदार सुविधा असलेल्या वंडर्स पार्ककडे होत असलेले दुर्लक्ष हे त्याच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरू लागले आहे. उन्हाळी सुटीत येथील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या उन्हात एखाद्याला भोवळ आल्यास प्रथमोपचार करण्याची सोय तिथे नाही. रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही.
रिक्षाही सहज मिळत नाही. त्यामुळे मोठा अपघात घडल्यास जीव धोक्यात येऊ शकतो. येथील राइड्सच्या देखभालीसाठी तज्ज्ञांची गरज आहे, मात्र अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
घडलेल्या प्रकाराची चौकशी केली आहे. लवकरच प्रथमोपचारांची सोय करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. लवकरच त्या ठिकाणी प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतील.
–महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई महापालिका