दुचाकीसह चारचाकी वाहनांचेही अपघात

शेखर हंप्रस
नवी मुंबई : पावसामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांची अवस्था बरी असली तरी उड्डाणपुलांवरील खड्डे मात्र धोकादायक झाले आहेत. पूल सुरू होण्याच्या ठिकाणी बहुतांश पुलांवर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचत आहे. याचा वाहनचालकांना आंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील रस्ते व पूल प्रशस्त असल्याने या ठिकाणांहून वाहतूक ही वेगवान असते. मध्येच अचानक मोठा खड्डा आल्याने वाहनचालकांची विशेषत: दुचाकी चालकांची मोठी पंचायत होत आहे.

खड्डय़ांत वाहन गेल्याने चालकांचे संतुलन जात असल्याने अपघात होत आहेत.  शिवाय यामुळे पुलांवरील वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. त्यात एखादे मालवाहू वाहन पुलावरून जात असले तरी वाहतूक ठप्प होत आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील नेरुळ, कोपरा, तळोजा आणि तुर्भे उड्डाणपुलांवर काही ठिकाणी असे खड्डे पडले आहेत. तर ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली ते थेट रबाळेपर्यंतच्या उड्डाणपुलावर खड्डय़ांमुळे धोका निर्माण झाला आहे. तर कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वे स्टेशनसमोरील उड्डाणपुलांचीही तीच अवस्था आहे. कोपरखरणे ते शिळफाटा रस्त्यावर तीन उड्डाणपूल आहेत. या तिन्ही पुलांच्या सुरुवातीला व पूल संपताना मोठे खड्डे पडले आहेत.

काही ठिकाणी पुलाच्या मध्यभागीही खड्डे आहेत. यात मिलेनियम बिझनेस पार्कसमोरील पुलावरील खड्डे धोकादायक ठरत आहेत. याशिवाय उरण फाटा ते जेएनपीटी रस्त्यावरील पुलांवरही हीच परिस्थिती आहे. तळोजा व किल्ले गावठाणसमोरील उड्डाणपुलावर मोठय़ा खड्डय़ांमुळे चारचाकी वाहनांचेही संतुलन बिघडत आहे, तर दुचाकींसाठी असा खड्डा जीवघेणा ठरू शकतो. रस्त्यासाठी वापरलेल्या स्टील पट्टय़ा उघडय़ा पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

दुरुस्तीचे काम सुरू

तुर्भे उड्डाणपुलावरील सर्व खड्डे बुजवण्यात आले आहेत, मात्र तरीही पाहणी केली जात असून खड्डा छोटा असला तरी त्वरित बुजवण्यात येतो. यासाठी दिवसरात्र पथक काम करते.

-सारिका देसाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

रबाळे, महापे, अंडरपास, सविता केलिकल्स येथील उड्डाणपूल एमएमआरडीएने बनवले असून महापालिकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. मात्र पाच वर्षे देखभाल दुरुस्ती त्यांच्याकडे असून रस्त्यांच्या अवस्थेबाबत कळवण्यात आले असून कामे सुरू आहेत. घणसोली, कोपरखैरणे, रबाळे, टी जंक्शन येथील उड्डाणपूल महापालिकेने बनवले असून तेथील खड्डे बुजवले जात आहेत.

– संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका रस्ते व पूल विविध प्राधिकरणांच्या ताब्यात

शीव-पनवेल महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे-बेलापूर महामार्ग नवी मुंबई महापालिका यांच्याकडे आहेत. मात्र या सर्वच मार्गावरील उड्डाणपूल हे अन्य प्राधिकरणाकडे आहेत. शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल एमएसआरडीसीकडे, एनपीटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाकडे, तर ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपूल एमएमआरडीए व नवी मुंबई महापालिकेकडे आहेत. या सर्वच प्राधिकरणांचे पुलांवरील खड्डय़ांकडे दुर्लक्ष होत आहे.

मी नेरुळमधील हॉटेलमध्ये काम करीत असून राहण्यास जासई येथे आहे. किल्ले गावठाण उड्डाणपुलावरून जात असताना खड्डा लक्षात न आल्याने दुचाकी त्यातून गेल्याने अपघात झाला. आज १५ दिवस झाले घरीच असून पाठीची समस्या निर्माण झाली आहे.

– मनोज मिश्रा, वाहनचालक

वाशी-पनवेल असा प्रवास दररोज करतो. तळोजा मार्बल मार्केटनजीक उड्डाणपुलाच्या खड्डय़ाने माझ्या चारचाकीचे नुकसान झाले आहे. पाणी भरल्याने खड्डे लक्षात येत नाहीत.

कुंदन काळे, वाहनचालक

Story img Loader