नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका शहराला अव्वल स्थानी आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या स्थानावर आहे तर पुण्यानंतर राहण्यायोग्य शहरात नवी मुंबईचा दुसरा क्रमांक लागत आहे. एकीकडे या सर्व जमेच्या बाजू असताना, दुसरीकडे नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषण पातळी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निर्देशांक मूल्यातून नवी मुंबईची हवा ही अति खराब असून हवा गुणवत्ता निर्देशांक २६५ वर पोहोचला आहे. मुंबईचा हवा निर्देशांक १९२ इतका आहे.
एकीकडे शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे सध्या शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. याचे एक कारण म्हणजे औद्योगिक कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडून मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण केले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील रबाळे , पावणे येथील कंपन्या थंडीच्या दिवसात धुक्याचा आसरा घेत मोठ्या प्रमाणावर हवेत रासायनिक मिश्चित वायू सोडतात. वाशी,बोनकोडे ,कोपरी गाव,नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली हे विभाग औद्योगिक वसाहतीला लागून आहेत त्यामुळे या विभागात वायू प्रदूषणाचा अधिक परिणाम जाणवत आहे.
हेही वाचा : वाहनाच्या फास्टटॅग व मोबाईलवरून दरोड्यातील गुन्ह्याची उकल
नॅशनल एक्यूआय- सीपीसीबीच्या अहवालाच्या मंगळवार दि. ८ च्या नोंदीनुसार नवी मुंबई शहरातील हवा अति खराब यादीत समाविष्ट होत असून हवा गुणवत्ता निर्देशांक ३०५ वर गेला आहे. आज बुधवार दुपारपर्यंत कोपरखैरणेचा हवा गुणवत्ता निर्देशांक १८७ एक्यूआय आणि नेरुळ २७५ एक्यूआय आणि ३२५ एक्यूआय इतकी नोंद झाली आहे. हवा गुणवत्ता स्थिती अधिक प्रदूषित नोंदवण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता सर्वेक्षणात करोडो रुपये खर्च करून शहर स्वच्छता ठेवण्यात आघाडी घेत आहे परंतु स्वच्छते बरोबरच दुसरीकडे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर नवी मुंबईच्या हवा गुणवत्तेकडे ही लक्ष देणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कोपरखैरणे, नेरुळ सर्वाधिक प्रदूषित
१. आज गुरुवारी कोपरखैरणे येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १८७ एक्यूआय आहे. ही हवा मध्यम प्रकारात मोडत असून या प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांचे विकार, दमा आणि हृदयरोग असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो.
२. नेरुळ से१९अ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २७५ एक्यूआय म्हणजेच खराब नोंदवण्यात आला असून सतत अशीच हवा स्थिती कायम राहिलास श्वास घेण्यास त्रास होतो.
३. नेरुळ मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ३२५ एक्यूआय नोंद झाला असून अति खराब यादीत समाविष्ट होत आहे. यामुळे हवेचे गुणवत्ता कायम अशीच राहिल्यास श्वसनासंबंधित विकार जडू शकतात.
नवी मुंबई शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हवा गुणवत्ता केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत . नॅशनल एक्यूआय- सीपीसीबीच्या अहवालातिल महितीची पडताळणी करण्यासाठी या केंद्रातून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक अहवाल तपासण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई