नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून आरोपी फरार झाला होता. सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला होता. मात्र आरोपी ज्या नावाने ओळखला जात होता ते मुळात त्याचे नाव नव्हते, त्यामुळे त्याचा तपास अद्याप लागला नव्हता. मात्र गुन्हे शाखेने त्याचा ठावठिकाणा शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा >>> बनावट शेअर ट्रेडिंग घोटाळा: इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक; सायबर पोलीस ठाण्याची कारवाई
अनंजय लालचंद्र पासवान उर्फ गानु असे यातील आरोपीचे नाव आहे. हा आरोपी रबाळे एमआयडीसी परिसरात राहत होता. त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. याबाबत माहिती मिळाल्यावर तिच्या पालकांनी आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १ सप्टेंबरला गुन्हा नोंद केला होता. मात्र त्यावेळी या परिसरात सर्वजण आरोपीला धनंजय लालचंद सरोज या नावाने ओळखत होते. त्यामुळे त्याच नावाने प्रथम खबरी अहवालात आरोपी म्हणून याच नावाची नोंद झाली होती. त्यामुळे पोलिसही याच नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते. मात्र मुळात आरोपीचे ते खरे नाव नसल्याने पळून गेलेला आरोपी शोधणे कठीण झाले होते.
हेही वाचा >>> रायगड जिल्ह्यातून ३ हजार २०६ कोटींचे मुद्रांक शुल्क जमा
या जुन्या गुन्ह्याबाबत तपास पुन्हा सुरु करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यामुळे तपास पुन्हा सुरु करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला होता. गुन्ह्यातील आरोपीचे खरे नाव हे अनंजय लालचंद्र पासवान उर्फ गानु (३१ वर्षे रा. ग्राम बघावर, पोस्ट-ताहिरपुर, रौनापार, जि. आझमगढ उत्तर प्रदेश) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कामी काही खबरी लोकांचीही मदत झाली. आरोपीने गुन्हा केल्यावर पळून जाताना त्याचा मोबाइल बेंगळुरू येथे बंद केला होता. त्याच परिसरातून त्याला अटक केली.