लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : खारघरमधील सोन्याच्या पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या चार आरोपींना पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. सेक्टर ३५ येथील बी एम ज्वेलर्स या पेढीतून आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून ११ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली होती.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन बंदुका आणि दागिने असा साडेसात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात आणखी आरोपींचा समावेश आहे का याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी वाचा-उरण : मासळीचा नवा हंगाम, मात्र मच्छीमारांना अनेक समस्या
मोहम्मद रिझवान अलीशेख (२७), अझरुद्दीन हुसनोदीन शेख (२८), ताहा तनवीर परवेझ सिंधी (२१) आणि राजवीर रामेश्वर कुमावत (२०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींना गुजरात आणि राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. २९ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास या आरोपींनी सेक्टर ३५ खारघर येथील बी एम ज्वेलर्स या सोन्याच्या पेढीवर जाऊन बंदुकीचा धाक दाखवत ११लाख ८० हजार रुपयांचे दागिने लुटले.
अग्निशस्त्रांसह अनेक प्रकारचे दागिने जप्त
आरोपींकडून हार, पेन्डंट, गोप चेन, गोल हार, बांगड्या, ब्रेसलेट, मंगळसूत्र, गोप असलेली साखळी असे विविध प्रकारचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याचबरोबर आरोपींनी गुन्हा करते वेळी वापरलेली दोन देशी बनावटीची अग्निशस्त्रे, मॅगझीन २, जिवंत काडतुस- ३ तसेच गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा एकूण सात लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.