सिडको आणि नवी मुंबई महानगर पालिकेने गुरुवारी कोपरखैरणे येथील अनेक बेकायदा बांधकामांवर संयुक्त कारवाई केली. दोन ठिकाणी आरसीसी बांधकाम असणाऱ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या, तर एका ठिकाणी सुमारे ५०पेक्षा जास्त झोपडय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्या.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत कारवाई सुरू होती. कोपरखैरणे सेक्टर २० येथील राधाकृष्ण मंदिरानजीक झोपडय़ा व दोन पक्क्य़ा घरांवर कारवाई करण्यात आली. सेक्टर २९ येथे असलेल्या धारण तलावानजीकची दोन अनधिकृत मंदिरे पाडण्यात आली. एका डेकोरेटरने उभे केलेले पक्के शेड पाडण्यात आले. संध्याकाळच्या सत्रात बालाजी सिनेमागृहासमोर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या ५० पेक्षा जास्त झोपडय़ा पाडण्यात आल्या. तसेच कोपरखैरणे एनएमएनटी डेपोनजीक इमारतीसाठी बांधण्यात आलेले बीम व पिलर्स पाडण्यात आले. या ठिकाणी पूर्वीही कारवाई करण्यात आली होती. झोपडय़ाही पाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती विभाग अधिकारी अशोक मढवी यांनी दिली.