लोकसत्ता टीम
नवी मुंबई: नवी मुंबई शहरात ही १५ जून पासून शाळा सुरू झाल्या आहेत, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर आरटीओची करडी नजर असून आतापर्यंत ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षी जून मध्ये २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती आरटीओ कडून देण्यात आली आहे. शाळा प्रशासन अधिक सजग झाले असून शाळा पातळीवर वर पडताळणी करूनच वाहनांना परवानगी दिली जात आहे.
करोना कालावधीत शाळा पूर्णपणे बंद असल्याने शालेय बस, वाहने ही बंद होती. मागील वर्षी शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे वाहने ही सुरू झाली होती, मात्र त्यावेळी बहुतांश वाहने नियमांना बगल देत विनापरवाना, नोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेत होते. त्यामुळे अशा अवैधपणे वाहने चालविणाऱ्या २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती.
आणखी वाचा-पनवेल: कळंबोलीत जलमापके चोरीला
यंदा १५ जून नंतर शाळा सुरू झाल्या असून अवैध वाहतूक करणाऱ्या ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व परवानाधारक वाहतूकदारांनी शालेय बस नियमावलीतील तरतूदीचे पालन करणे, विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करु नये, आरटीओकडून वाहनाचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाचा वाहन परवाना बॅच यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अवैध ११ शालेय वाहनांवर कारवाई केली असून ४२हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.