नवी मुंबई : ऑनलाइन समाज माध्यमातून १६/१७ वर्षांच्या मुलीचे फोटो आणि त्यांची माहिती (प्रोफाइल) द्वारे पाठवून ग्राहक पाठवणाऱ्या एका जोडप्यावर कारवाई करण्यात आली आहे. यातून तीन मुलींची सुटका करण्यात आली. मनीषा शिंदे व प्रवीण साळुंखे अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे स्वतःला नवरा-बायको म्हणून ओळख करून देत असले तरी पोलीस चौकशीत मानलेला पती असल्याचे समोर आले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला अल्पवयीन मुलींचे फोटो समाजमाध्यमाचा आधार घेत टाकले जात असून त्याद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्याद्वारे बनावट ग्राहक मिळवून समाजमाध्यमातूनच आरोपी जोडप्याशी संपर्क करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून तीन मुलींना पसंत केले गेले. त्यांना घेऊन जाण्यासाठी वाशीतील कल्याण ज्वेलर्स परिसरात भेटण्याचे ठरले. भेट झाली. तत्पूर्वी स्वतः व अधिकारी अंमलदार असे कारवाई करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सच्या पाठीमागे दबा धरून बसले होते. सदर ठिकाणी दलाल महिला व तीन पीडित मुली येणार असल्याने सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला व त्या ठिकाणी महिला व तिचा पती आल्याने ते बनावट ग्राहकांच्या गाडीत बसले. मात्र आरोपींना संशय आल्याने ते पळून जात असताना अत्यंत शिताफीने पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही असे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही याची अधिक चौकशी करीत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.
हेही वाचा – उरण: वन्यजीव संरक्षित कॅपिझ शंखांची तस्करी उघड, कोट्यवधीचे शंख जप्त
आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलम, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.