लोकसत्ता, पूनम सकपाळ

नवी मुंबई: वाहनचालक सुरक्षित वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालवताना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. हे अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई आरटीओ विभागाकडून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान आरटीओ विभागाकडून तब्बल १४ हजार ७९७ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १० हजार ३३८ वाहनचालक सुरक्षित वाहतूक नियमांना हरताळ फासून वाहने चालवीत असल्याचे समोर आले आहे. अशा वाहनचालकांवर वाशी आरटीओने कारवाईचा बडगा उगारला असून ३३८.८७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न वापरणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, डोन्ट ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह याविषयी जनजागृती केली जाते. त्यांना सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जातात. तरीदेखील वाहनचालक वाहतूक नियमांना बगल देत बेदरकारपणे वाहने चालवितात. सुरक्षित वाहतुकीचे धडे देऊनही शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत होती. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी आरटीओने कंबर कसली असून वर्षभरात कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी ३ ते ४ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

मात्र यंदा हा आकडा वाढला असून तब्बल १० हजार ३३८ वाहनचालकांवर कारवाई झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही हेल्मेट न वापरणाऱ्या आणि योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या तसेच वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या, विनासीटबेल्ट इत्यादी त्रुटी असणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. उर्वरित चार हजार वाहनचालकांवर विनापरवाना, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, अवैध वाहतूक, अवजड वाहतूक इत्यादी नियम मोडल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातही वाहन अपघात वाढत आहेत. त्या अनुषंगाने अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात १४ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये सुरक्षित वाहतूक नियम मोडणाऱ्या १०,३३८ वाहनांचा समावेश आहे. -हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी ,आरटीओ नवी मुंबई.