नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एपीएमसी मध्ये कारवाई करीत अंमली पदार्थ विक्री साठी आणलेल्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या कडून १३१. ५० ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ आढळून आलेला जप्त करण्यात आला आहे. त्याचे बाजार मूल्य १३ लाख १५ हजार असून त्यांनी एम डी कुठून आणले याचा तपास सुरु आहे.
जितेंद्र गुप्ता आणि भूपेंद्र हिरांचंद खंडेलवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जितेंद्र हा भंगार विक्रेता असून भूपेंद्र हा मालमत्ता दलाली करतो. दोघांनीही कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ वितरण सुरु केले होते. हे दोन्ही आरोपी एम डी अर्थात मेफेड्रोन विकण्यास एपीईएमसी परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कोपरी सिग्नल नजीक नाईन स्टोन हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही संशयित आरोपी दिसताच त्यांना पकडण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता जितेंद्र याच्या कडे ७लाख १५ हजार रुपयांचे ७१ ग्रॅम तर भूपेंद्र यांच्या कडे ६ लाख रुपयांची ६० ग्रॅम एम डी आढळून आले. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि अजय शिंदे यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे निलेशकुमार महाडिक आणि रणजित जाधव सह पथकाने केली आहे.