नवी मुंबई, खारघरमधून साडेतीन टन प्लास्टिक जप्त

प्लॉस्टिकविरोधातील करवाई थंडावली असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिल्यानंतर पुन्हा कारवाईला वेग आला आहे. वाशीतील रघुलीला मॉलमध्ये ११ व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे एकूण ५५ हजार रुपये तर इन ऑर्बिट मॉलमध्ये १२ व्यावसायिकांकडून ६० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. यामध्ये २.५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर खारघरमध्ये १ टन प्लास्टिक जप्त केले.

नेरुळ सेक्टर ६ येथील दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये ११ व्यावसायिकांकडून ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच  कोपरखैरणे विभागातून  १३ हजार तर बेलापूरमधून १० हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खारघर परिसरातील पजांबी पनीर या दुकानातून प्लास्टिक हस्तगत करण्यात आले आहे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने प्रभाग अधिकारी भगवान पाटील व जितू मढवी यांच्या  पथकाने कारवाई करून १ टन माल व पाच हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

‘सीवूड्स वेलफेअर’चे प्लास्टिक संकलन केंद्र

घरातील प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन

नवी मुंबई शहरात प्लास्टिकबंदी केली असतानाही प्लास्टिकचा वापर सर्रास सरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेने विभागवार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सीवूड्समधील ‘सीवूड्स रेसिंडेंट वेलफेअर असोसिएशन’ने यासाठी प्लास्टिक संकलन केंद्र सुरू केले आहे. नागरिकांनी घरातील वापरात नसणारे प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन केले आहे.

या असोसिएशनने या वर्षी प्लास्टिक मुक्तीचा देखावा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात केला होता. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव काळात विभागातील नागरिकांना व गणेशभक्तांना त्यांच्या घरात असलेले व वापरात नसलेले प्लास्टिक पिशव्या या  गणेश मंडळाकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. १०० किलो प्लास्टिक नागरिकांनी मंडळाकडे जमा केले होते.  असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र महाडिक यांनी सांगितले की, आम्ही उत्सवाच्या काळातही प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. नागरिकांनी घरातील प्लास्टिक या ठिकाणी आणून द्यावे.