गणेश नाईकांना राजकीय धक्का
२०१३ पासून चर्चेत असलेल्या बावखळेश्वर मंदिरावर अखेर मंगळवारी सायंकाळी कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपर्यंत ही कारवाई पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कारवाई करण्यापूर्वी मंदिरातील मूर्ती विधिवत पूजा करून हटविण्यात आल्या. ३२ एकर परिसरात हे आलिशान मंदिर उभारण्यात आले होते. या परिसरात एकूण तीन मंदिरे आहेत. त्यातील एकावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. अन्य दोन मंदिरांवरही कधीही कारवाई होऊ शकते.
ठाणे जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या ट्रस्टचे हे मंदिर असून ते वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी २०१३ मध्ये हे मंदिर आणि सीबीडी येथील ग्लास हाऊसविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने मंदिराचे बांधकाम बेकायदा ठरवून ते पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंदिर परिसरातील कार्यालय, अन्य बांधकाम तसेच ग्लास हाऊसवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली. मात्र मंदिरावर अद्याप कारवाई झाली नव्हती. मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली. मात्र त्यांना यश आले नाही.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २ हजार पोलीस, दंगलविरोधी पथक आणि राज्य राखीव दल तैनात करण्यात आले होते.