लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : वाहतूक नियमांचे पालन न करता अनेक वाहनचालक वाहने चालवितात. या नियमबाह्य वाहतुकीला आला घालण्यासाठी उरण वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे. वर्षभरात एकूण ४७ हजार ३५९ वाहनांवर उरणच्या वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये वाहन चालकांकडून ४ कोटी २२ लाख ७९ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभाकडून वाहनचालक आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेदरकारपणे वाहन चालविण्यात येत आहेत. अनधिकृत पणे मार्गावर उभ्या करण्यात आलेल्या २२ हजार २० वाहनांवर तर हेलमेट शिवाय प्रवास करणाऱ्या ५ हजार ६६१ दुचकीस्वारांवर तर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या १५५ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहनचालकांनी आपली वाहने द्रोणागिरी नोड पागोटे गावाजवळील टीआयपीएल पार्किंगमध्ये लावण्याबाबत उरण वाहतूक शाखेकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. तरीही अनेक वाहनचालक येथे आपली वाहने पार्किंग करीत होते. त्यामुळे रोडवर अवैध पार्क करण्यात आलेल्या ३,२४२ वाहनांवर आम्ही गेल्या वर्षभरात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमुळे येथील अपघात कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे, असे उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरात सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील पंजाब कॉन्व्हेर ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनी रोडवर गेल्या वर्षभरात अवैध पार्क करण्यात आलेल्या विविध ३ हजार २४२ वाहनांवर उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढेही या भागात वाहतूक शाखेची कारवाई सुरुच राहणार आहे. -अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, उरण