लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : शहरातील अनेक गणेश मंडळे मंडप परिसरातील सार्वजनिक जागा व्यापून तेथे व्यावसायिक जाहिरात फलकांद्वारे लाखोंची कमाई करीत असले तरी हे फलक महापालिकेच्या कोणत्याही परवानगीविना लावत असल्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे महापालिकेचा महसूल मात्र बुडत आहे. याबाबतचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेकडून मंडळांवर कारवाई करण्याऐवजी जाहिरात फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बेकायदा फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यास जबाबदार आहेत त्यांना अभय देऊन पालिका प्रशासनाने फलकाचे डिझाईन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध गणेश मंडळांच्या परिसरांतील जाहिरात किंवा नेत्यांची छायाचित्रे असलेल्या कथित शुभेच्छुकांचे किंवा यांच्यातर्फे असे नमूद केलेले असताना ज्यांची जाहिरात आहे ते किंवा हे पैसे वसूल करणारी मंडळे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी फलकाचे डिझाईन करणाऱ्यांना नोटीसा पाठवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.
आणखी वाचा-उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
फलकावर अमुक अमुक जाहिरात छापली किंवा एखाद्या नेत्याचा फोटो असेल तर त्यांची परवानगी घेतली का? अशी विचारणा करत ही कारवाई फलक तयार करणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. आता तर एक दिवसात फलक काढा अन्यथा मोठा दंड ठोठावण्यात येईल असा इशारा मनपाने दिला आहे. मात्र बहुतांश ठिकाणची देयके अद्याप आलेली नाहीत, त्यामुळे फलक काढले तर आमचा ग्राहक आम्हाला पैसे देणार नाही आणि नाही काढले तर मनपा मोठा दंड आकारेल अशा कात्रीत आम्ही अडकलो आहोत, अशी माहिती एका फलक बनवणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. सूत्रधाराला मोकाट सोडले जात आहे आणि आम्हाला पकडले जात आहे. फक्त आमच्यावर कारवाई केली जात आहे. गणेश मंडळांनी लाखो रुपये कमावले, ज्यांचे फलक होते त्यांची जाहिरात झाली, दोघांची कामे झाली. कारवाई मात्र आमच्यावर अशी संतप्त प्रतिक्रिया अन्य एका फलक डिझाईन बनवणाऱ्याने दिली.
आणखी वाचा-भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती, शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
फलक प्रत्यक्षात लावणारा कोण आहे याचा शोध घेतला असता फलक डिझाईन बनवणारेच फलक अनधिकृतरित्या लावतात असे निदर्शनास आले आहे. फलक लावण्यापूर्वी परवानगी आवश्यक आहे हे माहिती असताना फलक लावले जातात. त्यामुळे आतापर्यंत अशा फलक बनवून ते बसवणाऱ्या २३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत फलक काढून टाकण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. -डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, नमुंमपा