नवी मुंबई : नवी मुंबई मनपा अतिक्रमण विभाग सध्या धडाक्यात कारवाई करत असून बार असो वा इमारती, झोपडपट्टी असो वा अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात जोरदार कारवाईचा धडाका सुरू आहे. मात्र शहरात जागोजागी चौकाचौकांत लावण्यात आलेल्या जाहिराती आणि राजकीय नेत्यांच्या फलकांवर (फ्लेक्स) फारशी कारवाई वा जबर दंड वसुली केली जाताना दिसत नाही. त्यामुळे स्वच्छ सुंदर नवी मुंबई शहर विद्रूपीकरणाकडे वाटचाल करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूकपूर्वी आणि मतमोजणीनंतर शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रचंड आणि ठिकठिकाणी फलकबाजी सुरू आहे. कुठे जंगी कार्यक्रम, तर कुठे स्वागत, तर कुठे वाढदिवस अभीष्टचिंतन, तर कुठे अभिनंदन, आमचा नेता अशा आशयाचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व इमारतींचे संरचना परीक्षण करा, नवी मुंबई महापालिकेची एपीएमसीला नोटीस

फलकांवरील कार्यक्रम किंवा वाढदिवस उलटून अनेक आठवडे झाले तरी अनधिकृत फलक लावणाराही काढत नाही आणि नाराजी नको म्हणून स्थानिक विभाग कार्यालयातील संबंधित विभागाचे अधिकारीही काढायला धजत नाहीत. या सर्वांचा परिणाम म्हणून शहर विद्रुप झाले. शहरातील सर्व रेल्वे स्थानकांपर्यंत जाणारे रस्ते, जवळपास सर्व चौक, असा एकही दर्शनी भाग नाही ज्या ठिकाणी अनधिकृत फलकबाजी करण्यात आलेली नाही.

कोपरखैरणे येथे तीन टाकी येथे, तर मतदान निकाल लागण्यापूर्वीच घाईने साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे जिंकले म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयासमोर फलक लावण्यात आला होता. विभाग कार्यालयासमोर हे घडत असताना कुठलीही कारवाई केली जात नाही, असा सवाल कोपरखैरणेवासी करत आहेत.

हेही वाचा >>>द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी

याशिवाय रा. फ. नाईक चौक, बोनकोडे बस थांबा-चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, वाशी रेल्वे स्थानक, ऐरोली येथे दिवा गाव ते सेक्टर भागात असणारा पादचारी पूल, दिवा चौक, घणसोली स्थानक परिसर, सानपाडा स्थानक परिसर, बधाई चौक, पेट्रोल पंप चौक, सारसोळे बस डेपो, समाधान चौक, एलपी चौक, राजीव गांधी उड्डाणपूल चौक, जुईनगर मिलेनियम पार्क, सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन चौक, पोलीस आयुक्तालयाकडे जाणारा चौक, दिवाळी गाव, अग्रोळी गाव, नेरुळ अक्षर चौक, गायमुख चौक, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, आय सी एल शाळा चौक, अरेंजा सर्कल, अशा सर्व ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत.

विशेष म्हणजे सदर ठिकाणी फुकट फलकबाजी नेहमीच सुरू असते, मात्र सध्या निवडणूक जोर अद्याप ओसरला नसल्याने फलकात प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता लवकरच कारवाई केली जाईल, असे अधिकारीछाप उत्तर देण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken by navi mumbai municipal encroachment department on billboards put up in the city amy
Show comments