लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : येथील म्हातवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आणि उरण ओएनजीसी प्रकल्पा लगत असलेल्या नागरी वस्तीत असलेल्या आरएमसी प्लान्ट क्षेत्र अधिकारी यांच्याकडून तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. भर नागरी वस्तीत हा प्लान्ट उभारण्यात आला आहे. त्यामुळे या प्लान्टमुळे परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे नागाव, म्हातवली या दोन्ही ग्रामपंचायतीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या आरएमसी प्लांटवर कारवाई करण्याची मागणी नागाव-म्हातवली मधील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नागाव-म्हातवली ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू पाहाणाऱ्या या आरएमसी प्लांट सुरू करण्यासाठी म्हातवली ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती म्हातवली ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती फोफेरकर यांनी दिली. तसेच येथील विहिरी संदर्भात नागाव आणि म्हातवली या दोन्ही ग्रामपंचायतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आरएमसी प्लांटमध्ये दोन व तीन नंबरची खडी, ग्रीटसॅण्ड बनविण्यात येत आहे. खडी,ग्रीटसॅण्ड बनविताना नागाव- म्हातवली ग्रामपंचायतीच्या परिसरात धुळीचे लोट उठतात. परिसरात पसरणारे धुळीचे साम्राज्य आणि कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याआधीच ओएनजीसीच्या प्रकल्पाच्या वाढत्या हवेतील प्रदूषणामुळे याआधीच परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामध्ये आता नव्याने सुरू झालेल्या आरएमसी प्लांटची भर पडली आहे.
या आरएमसी प्लांटमुळे सभोवताली धूळ आणि आवाजाने म्हातवली – नागाव ग्रामस्थ त्रासले असून दोन्ही ग्रामपंचायतीही कारवाई करण्याबाबत मुग गिळून गप्प आहेत.असा गंभीर आरोप नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वप्निल माळी यांनी माहिती देताना केला आहे. दरम्यान या प्लान्टची तातडीने तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
म्हातवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेला आरएमसी प्लांट कायदेशीर की बेकायदेशीर आहे याची प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी यांच्या कडून तपासणी करून त्यांच्या अहवाला नंतर कारवाई करु अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी विक्रांत भालेराव यांनी दिली.
विहिरीची दुरवस्था
आज ज्या ठिकाणी आरएमसी प्लांट कार्यन्वित आहे. त्याच ठिकाणी नागाव ग्रामपंचायतीने १९९८ साली नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून पाच लाख रुपये खर्चून एक विहीर बांधली आहे. मात्र येथील आरएमसी प्लांटची धूळ, सिमेंट, काँक्रीट या विहिरीतच जमा होत आहे. यामुळे पाण्याची सोय म्हणून बांधण्यात आलेली विहीर दूषित झाल्याने नागरिकांसाठी निरुपयोगी ठरली आहे.