Adani Township in Navi Mumbai: बहुप्रतिक्षित व बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे. तिथून विमान उड्डाणं सुरू झाल्यानंतर अदाणी समूहाकडून नवी मुंबईत मोठा निवासी प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यासंदर्भात मिंटनं सविस्तर वृत्त दिलं आहे. गुजरातमध्ये अदाणी समूहानं तब्बल ५ हजार कोटींची गुंतवणूक करून ‘शांतीग्राम’ हा मोठा प्रकल्प उभारला. या प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प आता नवी मुंबईत उभारण्याची तयारी अदाणी समूहाने केली आहे. तब्बल १ हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
धारावीपेक्षा दुप्पट आकाराचा प्रकल्प
मुंबईजवळच नवी मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण त्याचवेळी नवी मुंबईत विमानतळाच्या अनुषंगाने विकासकामांना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता अदाणी समूह गुजरातमधील शांतीग्राम प्रकल्पाच्या दुप्पट आकाराचा निवासी प्रकल्प नवी मुंबईत उभारणार असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पही अदाणींकडूनच हाताळला जात असून ६०० एकरवरील या प्रकल्पापेक्षाही नवी मुंबईतील टाऊनशिप जवळपास दुप्पट आकाराची असेल.
१० हजार कोटींची गुंतवणूक!
येत्या दशकभरात नवी मुंबईत अदाणी समूहाकडून उभारला जाणारा हा प्रकल्प बांधून तयार होईल, असं वृत्त मिंटनं प्रकल्पाशी संबंधित दोन व्यक्तींच्या हवाल्याने दिलं आहे. २०१० साली अदाणींनी रीअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. अहमदाबादमधील शांतीग्राम हा ६०० एकरचा प्रकल्प त्यांनी पाच वर्षांत बांधून पूर्ण केला. या प्रकल्पासाठी अदाणींनी ५ हजार कोटींची गुंतवणूक केली होती. आता नवी मुंबईत उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पासाठी दुप्पट म्हणजेच १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
प्रकल्पाचं नाव ‘अदाणी पनवेल’
दरम्यान, या प्रकल्पाचं नाव ‘अदाणी पनवेल’ असेल, असं या वृत्तात म्हटलं आहे. प्रकल्पासाठी काही आवश्यक परवानग्यांची कंपनीला प्रतीक्षा असून त्यानंतर प्रकल्पाची घोषणा केली जाईल. याशिवाय, प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी रस्त्याचं बांधकामही अद्याप झालेलं नाही. नवी मुंबईतील प्रकल्प हा गुजरातमधील शांतीग्राम प्रकल्पापेक्षा दुप्पट मोठा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असेल, असं सांगितलं जात आहे.
नवी मुंबईत भविष्यात येऊ घातलेले प्रकल्प
दरम्यान, गेल्या काही वर्षांत अनेक बिल्डर्सनी नवी मुंबईत जमिनी विकत घेतल्या असून येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडून प्रकल्पांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये के. रहेजा कॉर्पोरेशन होम्स, गोदरेज प्रॉपर्टीज या काही बांधकाम व्यावसायिकांचा समावेश असल्याचंही मिंटनं नमूद केलं आहे. यात जुईनगर भागात रहेजा बिल्डर्सचे पाच टॉवर्स तर खारघरमध्ये गोदरेजचा प्रकल्प येणार असल्याचं सांगितलं जात आहे.