पनवेल: बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार स्वयंविकास पॅनेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी झालेल्या गृहनिर्माण संस्थेच्या निवडणूकीचा निकाल रविवारी सायंकाळी खारघर येथील एस. सी. पाटील महाविद्यालयात जाहीर झाला. या निकालामध्ये स्वयंविकास पॅनलचे १९ जागांवर सर्वच उमेदवार निवडूण आल्याने पोलीस बांधवांनी समाधान व्यक्त केले. या निवडणूकीत ५० टक्के मतदान झाले होते. मागील अनेक वर्षांपासून पोलीसांना घरे न मिळाल्याने पोलीस व त्यांचे कुटूंबिय नैराश्यात आहेत. अखेर नवे स्वयंविकास सहकार पॅनल हे हक्काचे घर मिळवून देईल या उमेदीने स्वयंविकास पॅनलवर पोलीसांनी विश्वास टाकला आहे. स्वयंविकास या पॅनलचे मुख्य सल्लागार जेष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभु हे आहेत.

२०१२ पासून माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या संकल्पनेतून मुंबई पोलीसांसाठी हक्काचे घर बांधण्यासाठी हा निधी जमविण्यात आला होता. २०१२ साली शंभर रुपये नाममात्र दराचे १३ हजाराहून अधिक सभासद या सोसायटीचे बनले. मात्र प्रत्यक्षात घरांसाठी २०१६ साली तीन लाखांहून अधिक निधी पोलीसांच्या संस्थेकडे जमा करण्यात आला. गृहनिर्माण सोसायटी व जमिनीची प्रत्यक्षात मालकी या कायदेशीर बाबींची पुर्तता होण्यासाठी २०२२ उजाडले. या सर्व प्रक्रीयेदरम्यान अनेक पोलीसबांधव हे सेवानिवृत्त तर काही पोलीस बांधवांचा मृत्यू झाला. पोलीसांच्या मृत्यू पश्च्यात त्यांचे वारसदार न लागणे, अनेकांनी घर मिळत नसल्याने सोसायटीकडे जमा केलेली रक्कम परत काढून घेणे, असे प्रकार घडले. मागील काही महिन्याभरापूर्वी संबंधित सोसायटीचा कारभार हा प्रशासकाच्या हाती देण्यासाठीचे आदेश झाले. या सर्व नियमबाह्य कारभाराविरोधात उच्च न्यायालयात संदीप सावंत, सुभाष हमरे, दिलीप भोसले, विष्णू सावंत यांनी याचिका दाखल केली.

हेही वाचा… इंडीया बूल्स महागृहनिर्माण प्रकल्पात पाण्यासह इतर सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन

अजूनही या याचिकेवर अंतिम सूनावणी झाली नाही. जेष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभु यांनी या पोलीस बांधवांचे नेतृत्व केले. प्रभु यांना सल्लागार नेमल्यानंतर त्यांनी गृहनिर्माण संस्थेचा कारभार कायदेशीरपणे करण्यासाठी पाठपुरावा सूरु केला. नियमाप्रमाणे कारभार होण्यासाठी स्वयंविकास हे पॅनल स्थापन कऱण्यात आले. स्वयंविकास विरुद्ध सत्य स्वयंविकास सहकारी पॅनल आणि स्वप्नपूर्ती सहकार पॅनल अशा विविध पोलीस बांधवांच्या पॅनलमध्ये निवडणूक झाली. रविवारी निवडणूक निर्णय अधिका-यांनी ४९०६ एकुण मतदारांपैकी २४४१ मतदारांनी मतदान केल्याचे जाहीर केले. तसेच स्वयंविकास पॅनलचे १९ उमेदवारांना भरघोस मते पडल्याने त्यांचा विजय झाल्याचे जाहीर कऱण्यात आले.

हेही वाचा… उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना

खालापूर तालुक्यातील वायाळ येथे १२० एकर जमीनीचे क्षेत्र पोलीस बांधवांच्या घरांसाठी खरेदी केले आहे. मात्र १० वर्षे उलटली तरी येथे घरांचे बांधकाम सूरु कऱण्यात आलेले नाही. सूरुवातीला ३ लाखात मिळणारे घर 30 लाखात मिळणार असे सांगीतल्याने अनेकांनी या गृहनिर्माणातून काढता पाय घेतला. मात्र मुंबईच्या पोलीसांना हक्काचे घर तीस-या मुंबईत तेही लाखो रुपये किमतीत मिळणार असल्याने हा तोट्याचा व्यवहार असल्याची भावना अनेक पोलीस बांधवांची आहे. मुंबईत नव्हेतर किमान नवी मुंबईत तरी घरे मिळतील या आशेने पोलीसांनी सुरुवातीला अर्ज भरले होते. वास्तुविशारद प्रभु हे स्वयंविकास संकल्पनेच्या माध्यमातून घरे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडीत पोलीसांसाठी गृहनिर्माण सोसायटीची वायाळ येथील जागा ताब्यात घेऊन नवी मुंबईत जागा दिल्यास रक्षणकर्त्यांचा ख-या अर्थाने सन्मान राखला जाईल, अशी भावना अनेक पोलीसांनी व्यक्त केली.