नवी मुंबई : एपीएमसी ही सर्वात मोठी बाजार पेठ आहे. पंरतु शेतमालावरील नियमन मुक्ती उठवल्याने विनापरवाना थेट बाजार पेठ वाढल्या आहेत. शहरातील महत्वाच्या मुख्य चौका चौकात, रस्त्यावर गाड्या उभ्या करून शेतमालाची विक्री केली जात आहे. त्याच बरोबर एपीएमसी कांदा बटाटा बाजार आवरा बाहेर बेकायदेशीर व्यवसाय केला जात आहे. या बेकायदा व्यवसाय विरोधात बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नियम १९६७ प्रमाणे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे तालुका व रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील तीस गावे हे बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. या नियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या परवानगी शिवाय व्यापार करण्यास अटकाव आहे. या नियमानुसार मुंबई कृषि उत्पन्न बाजार क्षेत्रात कोणत्याही खासगी घाऊक बाजार चालविण्यास निर्बंध आहे. मात्र बाजार समितीच्या बाहेर मुख्य रस्त्यालगत कांदा बटाटा विक्री टेम्पो मधून अनधिकृतरित्या केली जाते. कृषि उत्पन्नाची बाजार आवाराबाहेर खरेदी-विक्री करण्यासाठी पणन संचालक यांचेकडून अधिकृत अनुज्ञप्ती घेणे आवश्यक आहे. मात्र या परवानगी शिवाय बेकायदेशीर विक्रेते ठाण मांडून बसले आहेत.
प्रशासनाने व्यवसायाची पाहणी केली असता विना परवाना घाऊक बाजार सदृश्य कामकाज करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विरोधात बाजार समिती प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वैध अनुज्ञप्तीशिवाय व्यापारी, अडत्या, दलाल, प्रक्रिया करणारा, तोलारी, मापनारा, सर्वेक्षक, वखारवाला म्हणून किंवा इतर कोणत्याही नात्याने काम करणारी व्यक्ति दोषी आढळून आल्यास ६ महीने मुदतीपर्यंत कैदेची शिक्षा किंवा ५०००रुपये दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील. तसेच तरीही उल्लंघन चालू राहिल्यास प्रत्येक दिवसाला उल्लंघनाबाबतीत १०० रुपयांपर्यंत आणि इतर कोणत्याही बाबतीत ५० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होईल असे नोटसमध्ये नमूद केले आहे. नोटीस बजावून देखील व्यवसाय सुरूच असल्याने सात दिवसात व्यवसाय बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी दि.२४ रोजी दुपारी २.०० वाजता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे.