नवी मुंबई – डिसेंबर अखेर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून एपीएमसी बाजार समितीवर संचालक मंडळ नसल्याने बाजार समितीच्या विकास कामांच्या बैठका होत नाहीत. परिणामी बाजार समितीची विकास कामे ठप्प आहेत. १२ जानेवारीला होणारी सभापतीची निवडणूक ही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीवर लवकरच प्रशासकाची नियुक्ती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०२० मध्ये संचालक मंडळ निवडणूक घेण्यात आली. त्याआधी तबबल ६ वर्षे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. सन २००८ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली होती. सन २०१३ मध्ये या मंडळाची मुदत संपली होती. त्यानंतर या संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली नाही. सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून डिसेंबर २०१४ मध्ये बाजार समितीचा कारभार प्रशासनाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली. २०२० मध्ये निवडणूक होऊन संचालक मंडळ स्थापन झाले.

हेही वाचा – नवी मुंबईची जुहू चौपाटी स्वच्छतेपासून दुर्लक्षित ,निर्माल्यकलश धुळीने माखलेले; पालिकेकडून दोन वेळा स्वच्छता  विचाराधीन ?

राज्यातील त्या-त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने संचालक म्हणून अपात्र ठरले आहेत. मुंबई एपीएमसीसह सहा विभागांतून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते. यामध्ये मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर हे ही आहेत. त्याबाबत पणन संचालक तथा मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी घेण्यात आली असून अद्याप त्याचा निर्णय गुलदस्त्यात आहे. तसेच १२ जानेवारीला होणारी सभापती निवडणूक ही स्थगित केली आहे. त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळ अपूर्ण असल्याने विकास कामे, बैठका ठप्प आहेत. परिणामी, मान्सूनपूर्व विकास कामांचा खोळंबा होत आहे. नवीन विकास कामांमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटारांची, मलनिसारण वाहिन्यांची कामे, इत्यादी कामे रखडली आहेत. निर्णयप्रक्रिया थांबली आहे. धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत, त्यामुळे एपीएमसी बाजार समितीवर लवकरच प्रशासकाची नेमणूक होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा – वाशी उड्डाणपुल महापालिकेकडे हस्तांतरित आता उड्डाणपुलावरील खड्ड्यांची जबाबदारी पालिका कधी घेणार ?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती नसल्याने संचालक मंडळ कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे धोरणात्मक निर्णयही ठप्प झाले आहेत. पणन विभागाला या परिस्थितीबाबत अवगत केले असून योग्य तो निर्णय घ्यावा असे पत्र दिले आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती उपसचिव प्रकाश अष्टेकर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administrator will be appointed to mumbai apmc ssb