लोकसत्ता,प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांतील नर्सरीच्या वर्गासाठी २०२३-२४ करिता प्रवेश प्रक्रियेस गेल्या शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आली आहे. पालिकेच्या सीवूड्स व कोपरखैरणे येथील दोन्ही शाळेत मिळून एकूण २४० प्रवेश देण्यात येणार असून पालकांच्या प्रवेशासाठी उड्या पडल्या आहेत. आतापर्यंत ११०० अर्ज प्राप्त झाले आहेत. २५ मार्चपर्यंत अर्ज स्विकारले जाणार असून प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांची संख्या आणखी वाढणार आहे. महापालिकेच्या सीवूडस व कोपरखैरणे अशा दोन शाळा मिळून फक्त २४० विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी लॉटरी काढण्याची वेळ येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे कोपरखैरणे, सेक्टर-११ आणि नेरूळ, सेक्टर-५० या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा चालू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये नर्सरी वर्गाकरीता प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. हा प्रवेश पूर्णत: निःशुल्क असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशासाठी पाल्याचे वय ३ वर्षे पूर्ण (३१ डिसेंबर २०२३ दिवसापर्यंत) असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,आधारकार्ड, वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत.

आणखी वाचा- नरेंद्र पाटील म्हणतात “आतापर्यंतचे सरकार माथाडी कामगारांना न्याय देण्यात अपयशी…”; भाजपला दिला घरचा आहेर

प्रवेश अर्ज संबंधित शाळेत २५ मार्च पर्यंत सर्व कागद पत्रांसह भरून देणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी शाळेपासून १ कि.मी. चे आत अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास नियुक्तीसाठी लॉटरी पध्दत अवलंबवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत प्रवेश अर्ज देण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पालिकेच्या शाळांना मागील अनेक वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा २४० जागांसाठी आतापर्यंत ११०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

एकीकडे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने मागील काही वर्षापासून सुरु करण्यात आलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून सीवूड्स येथील पालिकेची सीबीएसई शाळा खासगी संसथेमार्फत चालवण्यात येत आहे कोपरखैरणे येथील शाळा पालिकेच्यावतीने चालवण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना आतापर्यंत अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतू कोपरखैरणे येथील पालिका चालवत असलेल्या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने पालिकांची नाराजी असली तरी दुसरीकडे मोफत सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्यासाठी मात्र पालकांनी मोठी मागणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना चांगला प्रतिसाद असून कोपरखैरणे येथील शाळा महापालिकेच्या वतीने तर सीवूड्स येथील शाळा खासगी संस्थेच्यावतीने चालवण्यात येत आहेत. नर्सरी प्रवेशासाठी आतापर्यंत २४० जागांसाठी ११०० अर्ज प्राप्त झाले आहेत.तसेच २५ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संख्या आणखी वाढणार आहे. कोपरखैरणे व सीवूड्स येथील शाळेत प्रत्येकी १२० प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्याच्या मुदतीनंतर अर्जांची छाननी करुन नंतर लॉटरी काढण्यात येणार आहे. -सुलभा बारघरे, समन्वयक पालिका सीबीएसई शाळा नवी मुंबई