सिडकोच्या ११०० घरांच्या विक्रीसाठी जानेवारीत जाहिरात; तळोजात सर्वाधिक घरे
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सर्वासाठी घर योजनेअंर्तगत बांधण्यात येणाऱ्या १४ हजार ८३८ घरांपैकी १३ हजार ७३८ घरांची ऑक्टोबर महिन्यात यशस्वी सोडत काढल्यानंतर या महागृहनिर्मितीत विक्रीविना शिल्लक राहिलेल्या ११०० घरांची सिडको नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यात विक्री करणार आहे. सिडको कर्मचारी, पत्रकार, प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार अशा घटकांना आरक्षित ठेवण्यात आलेली तळोजा येथील ही घरे विक्री न झाल्याने त्यांची पुन्हा सोडत काढली जाणार आहे.
सिडकोने ५३ हजार घरबांधणीचे लक्ष्य येत्या तीन वर्षांत ठेवले आहे. मार्च १९७० मध्ये स्थापन झालेल्या सिडकोने मागील ४८ वर्षांत केवळ एक लाख ३० हजार घरे बांधलेली आहेत. मात्र केंद्र सरकारच्या सर्वासाठी घर या योजनेअंतर्गत राज्यात सिडको व म्हाडा यांना सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधण्याचे मोठे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे ५३ हजार घरे बांधणीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पहिल्याच झटक्यात १४ हजार ८३८ घरांचा महागृहनिर्मिती प्रकल्प तळोजा, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व घणसोली येथे हाती घेतला आहे. केवळ ५३ हजार घरांपुरते मर्यादित न राहाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने त्यात आणखी ५० हजार घरांची भर टाकून थेट ९० हजार घरांचा महागृहनिर्मितीचा प्रकल्प जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे. यापूर्वी सिडको प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर विक्री करीत होती. मात्र यानंतरच्या सर्व प्रकल्पात एकीकडे बांधकाम सुरू असताना दुसरीकडे विक्री करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कर्ज उचल घेण्याची संधी मिळून व्याज दर कमी भरावा लागत आहे. सिडकोच्या पहिल्या महागृहनिर्मितीची ऑगस्टमध्ये अर्ज विक्रीला सुरुवात होऊन ऑक्टोबरमध्ये यातील १३ हजार ७३८ घरे विकली गेली आहेत. या घरांसाठी एक लाख ९१ हजार मागणी अर्ज आले होते पण त्यात सिडको कर्मचारी, काही पत्रकार, माथाडी कामगार आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांना कमीत कमी दोन व जास्तीत जास्त पाच टक्के आरक्षण ठेवले आहे. त्यामुळे या घरांना आलेले मागणी अर्ज पूर्ण होऊन घरे शिल्लक राहिलेली आहेत. यात प्रकल्पग्रस्त व सिडको कर्मचाऱ्यांची सर्व आरक्षित घरे शिल्लक राहिलेली आहेत. सिडको कर्मचाऱ्यांमधील साध्या शिपायाचे पगारदेखील सहाव्या वेतन आयोगामुळे हजारोच्या घरात गेलेले आहेत तर प्रकल्पग्रस्तांचे उत्पन्न साडेबारा टक्के योजनेमुळे जास्त दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टय़ा दुर्बळ व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखीव असलेली ही घरांच्या निकषात हे घटक पात्र ठरले नाहीत. त्यामुळे १४ हजार ८३८ घरांपैकी १३ हजार ७३८ घरे विकली गेली असून ११०० घरे शिल्लक आहेत. त्यांची विक्री अर्ज सिडको पुढील महिन्यात पुन्हा काढणार आहे.
सर्वसाधारपणे दोन वेळा विक्रीसाठी घरे जाहीर करूनही त्यास मागणी न आल्यास आरक्षित असलेली ही घरे शासनाच्या परवानगीने नंतर सर्वसामान्यासाठी खुली केली जाणार आहेत.
म्हाडाची काही घरे व भूखंडांची येत्या काळात विक्री होणार आहे. त्यानंतर या घरांची विक्री करण्याची सिडकोची योजना आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते घरांचे वाटपपत्र
पाच नोडमधील महागृहनिर्मितीतील भाग्यवंत ग्राहकांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. त्यातील पाच ग्राहकांच्या सर्व पुराव्यांची छाननी करून एजाज अहमद, सतीश माने, मीना सरकटे, त्रिवेणी नाईक, दशऋणा गावित या ग्राहकांना प्रतिनिधी स्वरूपात घरांचे वाटपपत्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आले. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. पंतप्रधानांच्या हस्ते ग्राहकांना सिडकोची घरे मिळण्याची ही सिडकोच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
सिडकोच्या ऑक्टोबर महिन्यातील महागृहनिर्मितीच्या सोडतीत ११०० घरे शिल्लक राहिलेली आहेत. त्यांची विक्री करण्यासाठी सिडकोच्या पणन विभागाची तयारी झालेली आहे. त्या विक्रीचे आदेश अद्याप या विभागाला देण्यात आलेले नाहीत, पण ती विक्री कोणत्याही क्षणी होऊ शकते.
– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको