नवी मुंबई : तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गदर्शक सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तापमानवाढीमुळे उष्णतेची लाट जाणवते आहे. उष्माघातापासून बचावासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात याची माहिती नवी मुंबई पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. उष्माघाताचा त्रास झालेल्या व्यक्तीला हवेशीर जागेत बसवावे. त्यास पाणी पिण्यास द्यावे. जर स्नायूंना दुखापत झाली तर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना त्वरीत बोलवावे, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.
हे करा
– उन्हात घराबाहेर निघताना नागरिकांनी डोके झाकावे. टोपी, रूमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
– थेट सूर्यप्रकाशापासून स्वत:चे संरक्षण करावे.
– पुरेसे पाणी प्यावे.
– आहारात ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी अशा द्रव्य पदार्थांचा समावेश करावा.
– अधिक माहितीसाठी पालिकेच्या रुग्णालयाशी किंवा जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
हे करू नका
– दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाऊ नये.
– शारीरिक श्रमाची कामे करू नयेत.
-चपला किंवा बुटाशिवाय घराबाहेर जाऊ नये.
– चहा, कॉफी, साखरेचे अधिक प्रमाण आणि कार्बोनेटेड द्रव्य पदार्थांचे सेवन टाळावे.
– लहान मुले व पाळीव जनावरे यांना पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये ठेऊ नये.
उष्माघाताचे परिणाम
शरीराचे तापमान वाढणे, अति उष्म्यामुळे अंगावर रॅश येणे, हातापायांना सूज येणे, बेशुध्द पडणे, आधीच असलेल्या आजाराची तीव्रता वाढणे.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर, बेशुध्द होणे, मळमळ, उलटी, डोकेदुखी, खूप तहान लागणे, लघवी अत्यंत पिवळी होणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे.