डांबरीकरण व कॉंक्रटीकरणावरच भर; इको फ्रेंडली साहित्य वापराबाबत शंका
नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या पामबीच मार्गालगत ७.५ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येत असून ११.५८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प चांगलाच वादात सापडला आहे. सायकल ट्रॅकच्या एकंदरीत कामावारुनच मतमतांतरे असून सायकल ट्रॅकच्या निर्मितीवरुन चांगलाच कलगीतुरा रंगला असताना या सायकल ट्रॅकची निर्मिती करताना इको फ्रेन्डली गोष्टींचा वापर करण्याची सूचना एमसीझेडएमने १५२ व्या मिटींगमध्ये १६ फेब्रुवारी २०२१लाच दिली होती. त्यामध्ये डाबरीकरणाचा वापर कमी करुन बायोबायंडर व इतर इको फ्रेन्डली गोष्टींचा वापर करण्याचे सुचित करण्याचे आले होते. परंतू प्रत्यक्षात पामबीच मार्गालगत सुरु असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामात खरच या इको फ्रेन्डली गोष्टींचा वापर होतो की नाही याबाबत शंका निर्माण करण्यात येत आहे.होणार असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिकेने सायकलप्रेमींसाठी पामबीच मार्गालगतच्या समांतर रस्त्यालगत सायकल ट्रॅक तयार करण्यात येत असून प्रशासकाच्या काळात करोडो रुपयांचे प्रस्ताव पास करुन पालिका अधिकारी सामान्यांच्या कररुपाने मिळालेल्या पैशांची नासाडी करत आहेत. एकीकडे याच कामात ६० झाडे तोडल्याप्रकरणी बेलापूरच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संचेती यांनी नेरुळ विभागाच्या उपअभियंत्याला खुलासा करण्याची नोटीस बजावली असताना दुसरीकडे सायकल ट्रॅक बनवता त्यात इको फ्रेन्डली गोष्टींचा वापर करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणाबाबत नियंत्रण ठेवणाऱ्या शासनाच्या संस्थांनी सूचित केले होते.नवी मुंबई महापालिकेने जवळजवळ ९ किलोमीटरचा सायकल ट्रॅक बनवण्याचे निश्चित केले असले तरी सुरवातीला ७.५ किमी लांबीचा मोराज सर्कलपर्यंतचा सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन आहे. परंतू आता पालिकेने सारसोळे जंक्शनपर्यंतचाच सायकल ट्रॅकचे काम केले जात आहे.
पालिका मुख्यालयापासून सुरु होणारा हा सायकल ट्रॅक आता सारसोळे जंक्शनपर्यंत बनवण्यात येतअसला तरी इको फ्रेन्डली साहित्याचा वापर होतो की नाही याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पालिका मुख्यालयापासून सुरु होत असलेल्या या ट्रॅकबाबत इको फ्रे्डली साहित्य कोणते वापरले जाते याबाबत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांना विचारणा केली असता त्यांना याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले तर अनेक वेळा ठेकेदाराचा सुपरवायजर नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पालिकेचे या कामावर खरच नियंत्रण आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सायकल ट्रॅकचे काम मे. साकेत इन्फोप्रोजेक्ट यांच्या मार्फत सुरु असून वर्षभरापूर्वी या कामाचा कार्यादेश दिला असून काम पूर्ण करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत आहे. तर पालिकेच्या सुरु असलेल्या कामामध्ये जास्तीत जास्त डांबरीकरणाचा वापर व कॉंंक्रीटीकरणाचा अधिक वापर केला जात असून या सायकल ट्रॅकमध्ये कोणते इको फ्रेन्डली साहित्याचा वापर केला जातो अशी प्रशासनाला व कार्यकारी अभियंत्याला विचारणा केली असताउपअभियंत्याकडून माहिती घेऊन यादी देतो असे सांगीतले .त्यामुळे पालिकेच्या सायकल ट्रॅकमधील कामात इको फ्रेण्डली साहित्य वापराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची माहिती समीर बागवान यांनी दिली.
नवी मुंबई महापालिका अनावश्यक गोष्टींची निर्मिती करत आहेत.एकीकडे सायकल ट्रॅकसाठी करोडोंचा खर्च केला जात असताना दुसरीकडे नवी मुंबई शहरात नेरुळमध्ये बनवलेल्या सायकल ट्रॅकचा वापर पार्किंगसाठी केला जात आहे. शहरात खरच किती लोकांकडे सायकल आहे. शहराची लोकसंख्या किती व सायकलचा वापर किती करतात याची बाब विचारात घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करुन सायकल ट्रॅकपेक्षा लाखो झाडे लावा व ती जगवा तरच नागरीकांचे आरोग्य चांगले राहील. अनावश्यक खर्चावर निर्बंध ठेवणे आवश्यक असून पालिकेनेपर्यावरणाचे रक्षण करावे हे महत्वाचे आहे.-आबा रणावरे,पर्यावरण प्रेमी