परवडणाऱ्या घरांच्या आमिषाने तीन हजार ग्राहकांची एक हजार कोटींना फसवणूक
राज्याच्या मंत्र्याला किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांना अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते विकासकांच्या कार्यालयाचे उद्घाटन करायचे आणि नवीन पनवेलमध्ये आलिशान कार्यालय थाटायचे, त्यानंतर पाच ते १५ लाखांत दोन वर्षांत नवीन पनवेल परिसरात रेल्वेस्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर विहिघर, रिटघर, विचुंबे, आकुर्ली, नेरे या गावांमधील जमिनींवर इमारतीत सदनिका देतो, असे सांगायचे आणि गुंतवणूकदारांकडून मिळेल तेवढी आगाऊ रक्कम घ्यायची आणि तीन वर्षांनंतर याच गुंतवणूकदारांना त्यांनी भरलेली रक्कम वसूल करण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत हेलपाटे मारायला लावायचा, असा गैरधंदा करणारे लहानमोठे विकासक सध्या खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या परिसरात फोफावले आहेत.
गेल्या तीन वर्षांत १८ विकासक आणि डेव्हलपर्स कंपन्यांविरोधात फसवणुकीचे ३० गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही येथे आजही फसवणुकीचा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. या काळात तीन हजार गुंतवणूकदारांची एक हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ३० गुन्ह्य़ांचा तपास एकाच शाखेने केल्यास या प्रकरणातील खरे चेहरे समोर येतीलच त्याशिवाय चार वर्षांपासून अडकलेल्या गुंतवणूकदारांच्या रकमेचाही परतावा होईल. मात्र नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज असल्याचे या गुंतवणूकदारांचे मत आहे.
वर्तमानपत्रात स्वस्त घरांची जाहिरात वाचून ठाणे आणि मुंबईतील अनेक जण पनवेल रेल्वेस्थानकासमोर विकासकांची कार्यालये शोधत सुट्टीच्या दिवसांत येतात. पनवेल रेल्वेस्थानकापासून पूर्वेला १५ मिनिटांच्या अंतरावर ५ ते १५ लाखांत घरे असल्याने अनेकांनी आगाऊ रकमेसाठी पैसे नसताना कर्ज काढून या विकासकांकडे जमा केली आहे. दोन वर्षांनंतर दाखविलेल्या जागेवर एकही वीट न बांधल्याने फसल्याचे गुंतवणूकादारांना समजते. तोपर्यंत संबंधित विकासकाने हीच सामान्यांची रक्कम वेगळ्या कामासाठी किंवा नव्याने जमीन खरेदीसाठी लावल्याचे आजवरच्या पोलीस तपासात उघड झाले आहे.
नवीन नियमावलीतून सूट..
खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल शहर व नवीन पनवेल या परिसरांत मोठय़ा प्रमाणात झपाटय़ाने गृहप्रकल्प उभारण्याचा धंदा तेजीत असून गृहप्रकल्प उभारणीसोबत गुंतवणूकदारांची फसवणूकही मोठय़ा संख्येने होत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही विधिमंडळात हा प्रश्न मांडला होता. मुंख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असणाऱ्या नगरविकास विभागाने अशा फसवणुकींवर आळा बसण्यासाठी विकासकांना कठोर नियमावली घातली आहे. मात्र या नगरविकास विभागाचे हे आदेश पनवेलमधील या नियम भंग करून सामान्यांना लुबाडणाऱ्यांना लागू पडलेली नाही.
दरदिवशी नवा विकासक आरोपी
खांदेश्वर या एकाच पोलीस ठाण्यात प्रत्येक दिवशी एक नवीन विकासकांविरोधात तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक मुंबई व नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी आहेत, तर अनेक विधवा महिला आणि मोठय़ा संख्येत सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी यामध्ये लावली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून घेण्याऐवजी साहेब आमची गुंतवलेली रक्कम परत मिळवून द्या अशी भावना गुंतवणूकदारांची असते. मात्र कायद्याच्या कक्षेमुळे हे पोलिसांचे काम रकमा वसूल करण्याचे नसल्याने हा वाद न्यायालयात जातो.
पनवेलमधील सामान्य गुंतवणूकदारांची फ्लॅट खरेदीत होणाऱ्या फसवणुकीबाबत पोलीस नेहमीच सतर्क आहेत. त्यामुळेच तक्रारदाराने फिर्याद दिल्यास लगेचच संबंधित विकासकाच्या विरोधात गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रमाणही मोठे आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे एक पथक या सर्व फसवणुकीच्या गुन्ह्य़ांना एकत्रित करून त्याप्रकरणी तपास करतील. याबाबत नियोजन करीत आहोत. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. भविष्यात फसवणूक होणार नाही यासाठी पोलीस उपायुक्तांसह प्रभारींना आरोपींवर कायदेशीर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येतील.
– प्रभात रंजन, नवी मुंबई, पोलीस आयुक्त
‘स्वप्नपूर्ती होम्स’, ‘तिरुपती बालाजी’विरोधात सर्वाधिक गुन्हे
२०१३ पासून ते २०१६ पर्यंतच्या कालावधीत खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूक कंपन्यांची नावे व त्यांचे मालक (गुन्ह्य़ांची संख्या)
* रिलॅक्स होम बिल्डर – विजय कांबळे
* रामा डेव्हल्पर्स – अंजली टिकोगे
* स्वप्ननगरी होम – अनिल पोटे (गुन्ह्य़ाच संख्या १)
* ओम साई ड्रील होम्स – अनिल पोटे (१)
* सिद्धार्थ कॉर्पोरेशन अॅण्ड बिल्डर – प्रवीण पटेल (१)
* साई बिल्डर्स – नासीर खान (२)
* धरती बिल्डर – अरविंद पटेल (१)
* बजेट होम्स – नितीन झेंडे (१)
* मोर्या होम्स – रवी धुमाळ (२)
* दोस्ती इंटरप्रायजेस – दत्ता माने (१)
* सहारा होम्स – झकेरीया पटेल (१)
* अम्रित डेव्हलपर्स – सचिन झेंडे (३)
* स्वप्नपूर्ती होम्स – शरद मोझर (५)
* रीअल इंडिया – संतोष अग्रवाल (१)
* बालाजी ड्रीम सीटी – ज्ञानेश्वर शर्मा (१)
* साई इंटरप्रायजेस – अनिल ननवरे (१)
* माँ वैष्णवी डेव्हलपर्स – राकेश वर्मा (१)
* तिरुपती बालाजी – महेंद्रसिंग पवनकुमार सिंग (४)
* हिंदुस्थान होम्स – चुनिलाल गुप्ता (१)