मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, बदलापूर या मध्य व पश्चिम पट्टय़ांत घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने रायगड जिल्ह्य़ात नव्याने उदयास येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी प्राप्त झाली असल्याचे नुकत्याच भरलेल्या वाशी येथील मालमत्ता प्रदर्शन केंद्रात दिसून आले. अडीच हजारांपासून ते सहा हजार प्रती चौरस फुटांपर्यंत या ठिकाणी घरांचे दर असून प्रदर्शन केंद्रात सुमारे ४२ विकासक नैना क्षेत्राच्या नावाने स्टॉल मांडून बसले होते. भविष्यात या क्षेत्राला येणारे महत्त्व लक्षात घेता काही जण गुतंवणूक म्हणून तर काही जण पहिल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करीत आहेत.
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा टेक ऑफ आता निश्चित झाल्याने राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी विमानतळाच्या आजूबाजूच्या २७० गावांना विमानतळ प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोवर सोपविण्यात आले असून सिडकोने पहिल्या टप्प्यात २३ गावांचा विकास आराखडा तयार केला आहे. विकासाचे हे संपूर्ण क्षेत्र ६०० चौरस किलोमीटर असून दुसऱ्या टप्प्यातील विकास हा पहिल्या टप्प्यातील विकासावर अवलंबून आहे. ह्य़ा क्षेत्रात अनेक विकासकांनी नैना क्षेत्र जाहीर होण्यापूर्वीच हजारो एकर जमीन विकत घेऊन ठेवली असून त्यावर आता गृहसंकुल बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यातील ४२ विकासकांनी नुकत्याच वाशी येथे झालेल्या मालमत्ता प्रदर्शनात घर विक्री मांडली होती. जमिनी खरेदीमध्ये जास्त पैसा न लागल्याने विकासकांना येथील घरे नवी मुंबई, पनवेल, द्रोणागिरी यांच्या तुलनेत स्वस्त विकणे परवडणारे आहे. नैना क्षेत्रातील पथदर्शी प्रकल्पाला येत्या दीड महिन्यात मंजुरी मिळणार आहे. सिडको या भागाचे नियोजन प्राधिकरण असल्याने योग्य कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या २२ गृहनिर्माण प्रकल्पांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. सिडकोने त्यानंतर गृहनिर्माण मंजुरी देणे थांबविले असली तरी भविष्यातील गृहप्रकल्पाची जाहिरात करण्यात येत आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, तळोजा या भागांतील घरे ५० लाखांच्या खाली विकत मिळेनासी झाली आहेत. जमीन खरेदीत जास्त पैसा खर्च झाल्याने विकासक घरांची किमतीदेखील वाढीव लावत असल्याचे दिसून येत आहे. नैना क्षेत्रात विकासकांनी परवडणाऱ्या घरांना महत्त्व दिले असून या ठिकाणी १५ लाखांपासून ते ३० लाखांपर्यंत घरांची उपलब्धता आहे. आर्थिक मंदीच्या या काळात घरात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गरज म्हणूनच घर विकत घेणारे पुढे येत आहेत. विमानतळ, मेट्रो यांसारख्या बडय़ा प्रकल्पाबरोबरच उरण- नेरुळ रेल्वे प्रकल्प, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण यामुळे नैना क्षेत्राचे महत्त्व वाढत असून या भागात अनेक छोटे-मोठे गृहनिर्माण प्रकल्प येत्या काळात उभे राहणार आहेत. यात काही बंगलो योजनांचा देखील समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवडणारी घरे ही आता काळाची गरज झाली असल्याने बडय़ा बिल्डरांनी देखील आता छोटय़ा घरांच्या निर्मितीवर भर दिला आहे. येत्या काळात पनवेलमध्ये वीस हजार घरांचा प्रकल्प येणार आहे. त्याच्या आजूबाजूला विकासक छोटी घरे बांधत असून रेल्वे, बस कनेक्टिव्हिटीमुळे गरजवंत या ठिकाणी राहण्यास येण्याची शक्यता आहे. नैना क्षेत्राची त्यामुळे महत्त्व वाढले असून हा ट्रेड कर्जतपर्यंत गेला आहे.
अश्विन रुपारेल, विकासक

परवडणारी घरे ही आता काळाची गरज झाली असल्याने बडय़ा बिल्डरांनी देखील आता छोटय़ा घरांच्या निर्मितीवर भर दिला आहे. येत्या काळात पनवेलमध्ये वीस हजार घरांचा प्रकल्प येणार आहे. त्याच्या आजूबाजूला विकासक छोटी घरे बांधत असून रेल्वे, बस कनेक्टिव्हिटीमुळे गरजवंत या ठिकाणी राहण्यास येण्याची शक्यता आहे. नैना क्षेत्राची त्यामुळे महत्त्व वाढले असून हा ट्रेड कर्जतपर्यंत गेला आहे.
अश्विन रुपारेल, विकासक