गेले पाच दिवस विमानतळावर तपासणी; सोमवापर्यंत बाजारात
मुंबईच्या बाजारात येणरा दक्षिण आफ्रिकेचा हापूस मुंबई विमानतळावरील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाच्या कचाटय़ात सापडला आहे. त्यामुळे तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात येणारा आंबा लांबणीवर पडला आहे. बुधवापर्यंत हा हापूस विक्रीसाठी ठेवला जाणार होता.
थायलंडमधून विविध प्रकारची फळे आयात करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दलालाने या आंब्याची सुटका करण्याचे काम हाती घेतले आहे. शुक्रवारी सुटका होऊन शनिवारी किंवा सोमवारी तो विक्रीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. त्याची किंमत डझनला दोन हजारांच्या घरात राहणार आहे.
या २०० डझन हापूसच्या पाठोपाठ आणखी ५०० डझन आंबा मुंबईत दाखल झाला आहे. हा हंगाम पुढील दीड महिना राहणारा आहे. २०११ मध्ये कोकणातील दापोली कृषी विद्यापीठातून काही हापूस आंब्याचे कलम व रोपे दक्षिण आफ्रिकेत नेऊन ‘मलावी मॅन्गोज ऑपरेशन लिमिटेड’ या कंपनीने बागायत केली आहे. सहाशे एकरवर केलेल्या या बागेत आता फळधारणा झाली असून या आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. सिंगापूर, आखाती देश, युरोपबरोबर हा हापूस भारतात (मुंबईत) रविवारी पाठविण्यात आला होता. मात्र केंद्रीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न केल्याने विमानतळाच्या कार्गोमध्ये पडून आहे.
पाच दिवस झाले तरी माल सोडण्यात आला नाही. गुरुवारी ही प्रक्रिया नव्याने पुन्हा करण्यात आली असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हा आंबा बाजारात येईल, अशी आशा या आंब्याचे येथील व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून हापूस आंबा पहिल्यांदा येत असल्याने त्याची सर्व तपासणी केली जात आहे.
आणखी ५०० डझन
आणखी ५०० डझन हापूस मुंबईत डेरेदाखल झाला आहे. पहिल्या आयात आंब्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुसरी निर्यात लवकर मोकळी होण्याची शक्यता आहे.