नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारात परदेशातील आफ्रिकन मलावी हापूसचे ८००बॉक्स आज शनिवारी बाजरातील व्यापारी संजय पानसरे यांच्या कडे दाखल झाला आहे. हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बाजारात परदेशातील मलावी हापूस देखील दाखल झालेला आहे. त्यामुळे ग्राहक देशी हापूसबरोबरच परदेशी हापूसला पसंती देत आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू
एपीएमसी बाजारात मार्चमध्ये देवगड हापूसचा खरा हंगाम सुरू होतो. मात्र बाजारात गेल्या काही वर्षांपासून परदेशी मलावी हापूस दाखल होत आहे. आज बाजारात ८०० बॉक्स आवक झाली असून एका बॉक्समध्ये ९ ते १६ नग असतात. बाजारात आज प्रतिबॉक्स ५ हजार रुपये ते ३ हजार ७०० रु दराने मलावी हापूसची विक्री झाली. पुढील आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी १ हजार बॉक्स दाखल होतील, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली आहे. ११ वर्षांपूर्वी रत्नागिरीमधून हापूस आंब्याच्या काड्या मलावी मध्ये नेवून लागवड करण्यात आली होती. सुमारे ४०० एकरवर आंब्यांच्या काड्यापासून कलम तयार करून लागवड करण्यात आली होती . आता त्याला फळधारणा होत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील वातावरण त्याठिकाणी पोषक असते. त्यामुळे यादरम्यान त्याठिकाणी मलावी हापूसचे उत्पादन घेतले जाते. १५ डिसेंबर पर्यंत या मलावी हापूसचा हंगाम सुरू रहाणार आहे.