लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : गणेशोत्सवात उपवासाचे दिवस संपताच उरणच्या मासळी बाजारात खरेदीसाठी बुधवारी खवय्यांची गर्दी झाली होती. ७ सप्टेंबरपासून गणपती उत्सव असल्याने व त्यापूर्वी श्रावण महिना सुरू होता. त्यामुळे अनेकांचे उपवासाचे दिवस सुरू होते. मात्र हे उपवास अनंत चतुर्दशीला संपले आहेत. त्यानंतर बुधवार हा पहिलाच दिवस आल्याने खवय्यांची मासळी खरेदीसाठी उरणच्या मासळी बाजारात गर्दी झाली होती.
उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. यामध्ये, सुमारे ७०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी असून मासळीची खरेदी- विक्री करण्यासाठी त्यांना मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते.
आणखी वाचा-गरजेपोटी घरांची घोषणा निवडणुकांमध्येच का? प्रकल्पग्रस्तांचा सवाल
दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ६०० मीटर लांबीचे ‘फिशिंग- डॉक’ करंजा येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये, मासेमारी बोटीतील मासळी बंदरात उतरवून त्याच्या खरेदी-विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नव्याने सुरू झालेल्या ‘करंजा – द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर’ येथे अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी हे घाऊक आणि दैनंदिन गरजेसाठी आवश्यक मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. यामध्ये, सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारामध्ये छोट्या करंदीपासून कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोंबील अशा सुमारे ३० ते ४० प्रकारचे अनेक मासे विक्रीसाठी दिसून येत आहेत. तर करंजा येथील या बंदरात १०० रुपयांपासून १२०० रुपये किलोच्या दराने मासळी विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
आणखी वाचा-नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
करंजा बाजारात बला, वाम, पाला, माखली, मांदेली, ढोमी, पाकट, शिंगाला, चिंबोरी असे मासेदेखील विक्रीसाठी असल्याचे दिसून आले आहे. तर, या मासळी बाजारात सुरमई, कोलंबी, कुपा, पापलेट यांना अधिक मागणी आहे.
ताज्या मासळीची मागणी
खोल समुद्रातील मासळीबरोबरच खाडी आणि तळ्यात पाळण्यात येणाऱ्या ताज्या मासळीचीही अधिकची मागणी वाढली आहे. यात मासे, कोळंबी, खेकडे आदी ताजी मासळी बाजारात येऊ लागली आहे.
© The Indian Express (P) Ltd