ठाणे बेलापूर मार्गावरी तुर्भे स्टेशनमधून बाहेर पडून रहिवासी वस्तीत जाणारा रस्ता ओलांडताना २५ पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे पंधरा वर्षापेक्षा अधिक वर्षापासून पादचारी उड्डाणपुलाची मागणी करण्यात येत आहे. अखेर तुर्भेकरांनी निर्णायक आंदोलनाची हाक देताच आज (शनिवारी) मनपा अधिकारी आणि तुर्भे स्टोअर रहिवाशात बैठक पार पडली. मनपा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आठ दिवसात काम सुरु होईल, असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : नवीन वर्षात आरटीओचे कामकाज नवीन कार्यालयातून
तुर्भे स्टेशन ते तुर्भे स्टोअर या रहिवासीवस्ती दरम्यान ठाणे बेलापूर मार्ग येतो. या महामार्गावर तुर्भे रेल्वे स्टेशन समोर पादचारी उड्डाणपुलाची मागणी दीड दशकापासून केली जात आहे. या मागणीसाठी अनेकदा आंदोलनही झाले आहेत. मात्र महानगर पालिका याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे असा आरोप तुर्भे करांनी केला आहे. त्यामुळे तुर्भे स्टोअर वासियांनी पुन्हा एकदा आंदोलाचा इशारा दिला असून २७ तारखेला हे आंदोलन केले जाणार होते. तसे पत्र मनपा अधिकार्यांना दिल्यावर मनपा अधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीने माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात बैठक घेतली.
यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी आंदोलन न करण्याची विनंती केली तसेच गुरुवार पर्यत आय.आय.टी.चा अहवाल प्राप्त होताच काम सुरु केले जाईल असे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती देताना सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले कि आता पर्यत अनेक बळी रस्ता ओलांडताना गेले आहे दर वेळी रस्ता रोको आंदोलन केले जाते. असे आंदोलन करण्याची आमचीही इच्छा नसते मात्र त्या शिवाय मनपा अधिकारी जागे होत नाहीत. आम्ही आंदोलन करून थकलो असून आता निर्णायक धडक देण्याचा निर्धार केला होता. मात्र, बैठकीत आश्वासन दिले आहे.