तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात वारकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या मोर्चाला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरपीआय पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाला जाहीर पािठबा दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या निधनानंतर पनवेलमध्ये पहिल्यांदाच सर्वच राजकीय पक्षांनी आपले राजकीय मुद्दे बाजूला ठेवून एक होण्याची भूमिका घेतली. अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा त्रास सहन करणाऱ्या तळोजातील ग्रामस्थांनाही लढण्यासाठी बळ मिळाले आहे.
यावेळी कीर्तनकार बंडातात्या कराडकर, प्रकाश जवंजाळ, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, शेकापचे सरचिटणीस बाळाराम पाटील, शिवसेनेचे रामदास पाटील, बबन पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत, मनसेचे स्थानिक नेते व परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या महिला व लहान बालके मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आणि सिडकोच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील प्रदूषणामुळे घोट, घोटचाळ, सिद्धीकरवले, नितळस, तळोजा मजकूर या गावांना मोठा त्रास होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर स्थानिक कीर्तनकारांनी एकत्र येऊन सदगूरू वामनबाबा महाराज संघर्ष समिती स्थापन करून त्यामार्फत लढा सूरू केला. पहिल्यांदा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा नवीन प्रकल्प बंद करण्याची मागणी या संघर्ष समितीने केली. मात्र सर्व राजकीय पक्ष या समितीच्या सोबत असले तरीही या कंपनीचे ३० एकर जमिनीवरील काम अंतिम टप्यात पोलीस बंदोबस्तामध्ये पूर्ण झाले आहे.
ग्रामस्थांच्या प्रदूषणविरोधी लढय़ाला कंपनी अथवा सरकारी प्रशासनाने कोणतेही महत्त्व दिलेले नसल्याने पंचक्रोशीतील सुरुवातीला गावात जनजागृतीसाठी बैठका घेतल्या, पोलिसांकरवी पालकमंत्री प्रकाश मेहता यांनाही लेखी निवेदन दिले.
त्यानंतरही मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे नवीन प्रकल्पाचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्यास भाग पाडून शांततेत मंगळवारी हा मोर्चा काढून आपला विरोध कायम असल्याची माहिती या संघर्ष समितीचे अध्यक्ष धनाबुवा पाटील यांनी दिली.
आमदार ठाकूर यांनी ही लढाई विधिमंडळात लढणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच शेकापच्या विवेक पाटील यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी शेकाप शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे असल्याचा निर्धार यावेळी केला तर शिवसेनेचे बबन पाटील यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यापर्यंत हा प्रश्न मांडणार असल्याचे जाहीर केले.
प्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ
आरपीआय पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाला जाहीर पािठबा दिला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-05-2016 at 02:30 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitating about pollution in navi mumbai