लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : नवी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने कोणतीही पूर्व सूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवन रेखा ठरलेली एनएमएमटी बस सेवा व्यवस्थापनाने बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उरण चारफाटा येथे धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे खोपटे बस अपघातातील मयत आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपघाता नंतर कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून एनएमएमटी ची उरणमधील बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे प्रवाशांना आपलं निश्चित ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा एकदा धोकादायक खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला आहे. परिणामी वेळ आणि अधिकच्या खर्चाची भार आता उरणकरांच्या खिशावर पडत आहे. उरण ते नवी मुंबई दरम्यानच्या महानगरपालिके ह्या ३१ व ३० क्रमांकाच्या मार्गावरील एनएएमटीची बस सेवा सुरू होती.ती पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : देशमुख टोळीचा ४ वर्ष फरार आरोपी अखेर जेरबंद
एनएमएमटी बसने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यवसायिक यांनी पर्यायी मार्ग ठरवून आपला प्रवास सुरु केला आहे. यासाठी पर्याय म्हणून,लोकल,रिक्षा तसेच खाजगी इको वाहनांतून प्रवास केला. या धरण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयु, जनवादी महिला संघटना, डीआयएफआय या विविध संघटनानी हे आंदोलन केले. या धरण्याचे नेतृत्व माकपचे जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, हेमलता पाटील यांनी केले.