जगदीश तांडेल, लोकसत्ता
उरण : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उरण आणि उलवे परिसरात येत आहेत. त्यांच्या आगमनासाठी येथील हवा प्रदूषण करणाऱ्या दगडखाणी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच रस्तेही स्वच्छ केले आहेत. त्यातच मंगळवारी रात्री आलेल्या पावसाच्या सरीमुळे दररोज २०० ते २५० च्या दरम्यान असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी ५५ वर आला आहे. ही मात्रा म्हणजे सामान्य आहे.
उरण- पनवेल आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात सुरू असलेल्या दगड खाणी तसेच धूळ निर्माण करणारी कामे यामुळे उरण आणि परिसर देशात सर्वात दूषित शहर म्हणून गणले जात आहे. ही मात्रा ३०० पेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेजारच्या मुंबई व नवी मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेवरही झाला आहे. याकडे येथील स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मागील दोन वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून उरण, पनवेल आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील हवा प्रदूषण कमी झाले आहे.
आणखी वाचा-सागरी सेतूवर ताशी १०० किमी वेगमर्यादा; सुमारे ४०० कॅमेऱ्यांची वाहनांवर नजर
उरण तालुक्यातील अवेळी पावसामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी न्हावा शेवा सागरी (अटल सेतू)चे शुक्रवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी यांनी उरण-पनवेल तालुक्यातील अधिकृत व अनधिकृत दगड खाणी व क्रशरच्या वीज जोडण्या सहा जानेवारीपासूनच बंद केल्या आहेत. त्यामुळे येथील दगडखाणी मागील आठवड्यापासून बंद करण्यात आल्या आहेत. या वृत्ताला श्री कान्होबा क्रशर चालक मालक संघटनेचे सचिव अतुल भगत यांनी दुजोरा दिला आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्यास नियंत्रण आणणे शक्य आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमी झालेली प्रदूषणाची मात्र आहे. ही कायम ठेवण्यासाठी प्रशासन यापुढेही प्रयत्न करील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा-उरण-खारकोपर लोकलची चाचणी
वाढत्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष
वाढत्या प्रदूषणावर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलमधील प्रशासन व येथील यंत्रणा वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्याकडून अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र सर्वात प्रथम देशात प्रदूषणात क्रमांक लावणाऱ्या उरणमधील वाढत्या प्रदूषणावर प्रशासनाकडून कोणतेही उपाय केले नाहीत.