नवी मुंबई: मुंबईस लागून असलेल्या नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी दिवसागणिक वाढू लागल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने हवेचे प्रदूषण नियंत्रणात राहावे यासाठी युद्धपातळीवर उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमधील हवेच्या गुणवत्तेची दर दोन तासांनी तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पर्यावरण विभाग तसेच विभाग स्तरावर कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्तांना गुरुवारी एका विशेष बैठकीत दिले. तसेच शहरात जवळपास १०० चौकांमधील कारंजे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतील ठराविक उपनगरांमधील हवेची गुणवत्ता खालावू लागली असून वाशी, कोपरी, कोपरखैरणे, घणसोली, नेरुळ यांसारख्या उपनगरांमधील धुळीचे प्रमाणही वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईतील देवनार कचराभूमीतून निघणाºया उग्र दर्पामुळे वाशी, कोपरखैरणे तसेच पाम बीच मार्गावरील ठराविक वसाहतींमधील रहिवाशी मेटाकुटीस आले असून कोपरी भागातील काही रहिवाशांनी तर वाढत्या प्रदूषणाच्या मुद्दयावर धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान वाढत्या प्रदूषणाच्या मुद्दयावर उच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे निर्देश येताच नवी मुंबई महापालिका प्रशासनाची लगबग सुरू झाली असून आयुक्त राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी यासंबंधी आखण्यात येणाºया उपायांची जंत्रीच नवी मुंबईकरांपुढे सादर केली.

हेही वाचा… उपकार माना, ‘एनएमएमटी’ खारघरसाठी बस सोडते! चौकी नियंत्रकाचे प्रवाशांना उत्तर

धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविणे याशिवाय काही रस्त्यांवर पाण्याची फवारणी करणे, शहरातील १०० चौकांमधील कारंजे सुस्थितीत सुरू राहतील याची काळजी घ्यावी असेही ठरिवण्यात आले आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहेत. राडोरोडा विरोधी पथके २४ तास कार्यान्वित करण्यात आली असून वाशी, ऐरोली टोलनाक्यांवर ही पथके तैनात करण्यात आली आहेत.

कळंबोली येथील डिजिटल फलकात बिघाड

मागील दोन दिवसांपासून दिवस रात्रीत कळंबोली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेले डिजिटल फलकावर वायु गुणवत्ता निर्देशांक ३३० वर असल्याचे दर्शवित होता. मात्र पनवेल पालिकेच्या आयुक्तांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तातडीने यावर स्पष्टीकरण मागीतल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणेने धाव घेत नेमके काय घडले याची चौकशी केल्यावर या फलकामध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

पनवेल पालिकेच्या उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या ठेकेदार कंपनीला या फलकाची देखभाल व नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे त्या कंपनीच्या अभियंत्यांनी फलक व यंत्रातील तफावतीबद्दल कोणतीही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नव्हती. त्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांकाची देखरेख करणा-या इनोव्हा कंपनीच्या अभियंत्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी सूचना केल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह प्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांंनी दिली.

हा डिजिटल फलक प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक कोटी रुपये खर्च करुन उभारला होता.

भरारी पथके, जनजागृती, पाण्याचे फवारे

नवी मुंबई महापालिकेने यापूर्वीच सात ठिकाणी हवा तपासणी केंद्रांची उभारणी केली आहे. या तपासणी केंद्रातून मिळणाºया नोंदीचे दर दोन तासांनी विश्लेषण करण्याची जबाबदारी पर्यावरण विभाग आणि सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. हवेचा दर्जा सतत तपासल्यामुळे यासंबंधी तातडीने उपायांची आखणी करणे महापालिकेस शक्य होणार आहे. याशिवाय शहरातील बांधकाम क्षेत्रांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

नवी मुंबईकरांना आवाहन

दरम्यान शाळा महाविद्याालयांमधून जनजागृती करतानाचहवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी नवी मुंबईकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ ही मोहीम राबविताना नवी मुंबईकरांनी पर्यावरणपूरक स्वच्छ प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air quality inspection every two hours to keep the air pollution under control of navi mumbai dvr
Show comments