नाटय़गृह तीन वर्षे कागदावरच; नाटय़प्रेमींत नाराजी
ऐरोली नाटय़गृहाचा मुद्दा शिवसेना आणि राष्ट्रवादीने सलग तीन निवडणुकांत लावून धरला असला, तरीही या नाटय़गृहाबाबत भूमिपूजनापलीकडे काहीही प्रगती झालेली नाही. २०१४ साली भूमिपूजन झाल्यापासून चार वर्षे उलटली, नाटय़गृह उभारणीची मुदत संपली, पहिल्या कंत्राटदाराने आर्थिक समस्यांचे कारण देत हात वर केले आणि या साऱ्या गोंधळात नाटय़प्रेमी मात्र उपेक्षितच राहिले. आता पालिकेने या नाटय़गृहासाठी नवा कंत्राटदार शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
ऐरोलीतील अत्यंत मध्यवर्ती अशा सेक्टर ४ व ५च्या मधोमध हे नाटय़गृह उभारण्यात येणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरून, पटनी रोडवरून ऐरोलीत येणाऱ्या किंवा मुलुंड मार्गावरून ऐरोलीत येणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय सोयीचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आणि तेव्हा राष्ट्रवादीत असणारे नगरसेवक एम. के. मढवी यांनी ऐरोली सेक्टर ५ येथील माउली संकुलाजवळील भूखंडावर नाटय़गृहाचे भूमिपूजन केले. त्यांनतर झालेल्या विधानसभा आणि पालिका निवडणुकीतदेखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हा मुद्दा प्रचारात लावून धरला.
नाटय़गृहाचे काम महावीर कंपनीला देण्यात आले, मात्र कंत्राटदाराने आर्थिक विवंचनेचे कारण देत काम लांबणीवर टाकले. तांत्रिक अडचणी सांगत पालिका प्रशासनानेही दिरंगाई केली. २०१४ साली भूमिपूजन झालेल्या या जागेवर गेल्या तीन वर्षांत खोदकामापलीकडे काहीच झालेले नाही. आता या खोदलेल्या जागेत पाणी साचून तिला तळ्याचे रूप आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २०१६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक यांनी तीन वर्षांत एकादाही या प्रकल्पाची पाहणी केली नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक खुले व्हावे म्हणून आग्रही असलेले महापौर सुधाकर सोनवणे यांनीदेखील आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत ऐरोली नाटय़गृहाकडे दुर्लक्षच केले. आता जुन्या ठेकेदाराला बदलून नव्या ठेकेदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा भरण्यात येत आहेत. नाटय़गृहाच्या जागेशेजारी असलेल्या उद्यानाचे काम नियोजित वेळेआधीच पूर्ण करण्यात आले आहे. भाजी मंडईचे काम सध्या जोरात सुरू आहे. केवळ नाटय़गृहाविषयीच उदासीनता दाखवण्यात येत असल्यामुळे ऐरोली आणि परिसरातील नाटय़प्रेमींमध्ये नाराजी आहे.
नाटय़गृहाचे काम ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे रखडले आहे. ठेकेदाराला प्रशासनाकडून काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नवीन ठेकेदार नेमण्याविषयी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.
–अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा
ऐरोली नाटय़गृहाचे रेंगाळलेले काम ही खरे तर लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसून त्यामुळेच हा प्रकल्प रखडला आहे. अखिल भारतीय नवी मुंबई नाटय़ कलावंत मंडळाच्या वतीने नाटय़गृहाच्या कामसंदर्भात आंदोलन करण्यात येईल.
–अशोक पालवे, नाटय़कर्मी