नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते गणेश नाईक यांच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक सोपी होऊ द्यायची नाही असा चंग बांधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबईतील कडव्या समर्थकांनी एकत्र येत बंडखोर उमेदवार विजय चौगुले यांना रिंगणात कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णय ठाणे आणि नवी मुंबईतील राजकीय संघर्षाचा परिणाम असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चौगुले यांच्यावर उमेदवार माघारीसाठी दबाव येऊ नये यासाठी गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारासह शिंदेसेनेचे ऐरोलीतील प्रमुख प्रभावी नेते ‘नाॅट रिचेबल’ झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे, या भागातील काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या काही नेत्यांनीही साथ देण्याचा शब्द दिल्याने चौगुले यांच्या बंडाला हवा मिळाल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐरोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार एम.के.मढवी यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. ऐरोलीतील तीन प्रभागांमध्ये प्रभाव असणारे मढवी संपूर्ण मतदारसंघात फारसे प्रभावी नाहीत. तसेच मढवी आणि सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांचेही फारसे काही सख्य नाही. मढवी यांची उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी तातडीने आपला राजीनामा पाठवून दिला. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला असला तरी चालले असते मात्र मढवी नको अशी भूमिका उद्धव सेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे मांडली. ऐरोली मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला जावा असा या पक्षातील नेत्यांचा आग्रह होता. नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचे पुत्र अनिकेत यांनी गेल्या काही वर्षापासून या मतदारसंघासाठी तयारी केली होती. अनिकेत यांच्यासाठी काँग्रेसने हा मतदारसंघ मागितला खरा मात्र वाटाघाटीत तो उद्धव सेनेला सुटला. या सगळ्या घडामोडी सुरू असताना भाजपने ऐरोलीतून गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे नक्की केले. नाईक यांचे पुत्र संदीप बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून रिंगणात असताना मोठ्या नाईकांनी मात्र कमळाची साथ सोडली नाही. महायुतीतील शिंदे गटाचा असलेला विरोध नाईकांना माहीत होता. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून नाईकांनी शिंदे गटातील नेत्यांची कोंडी करण्याची खेळी खेळली.

हेही वाचा :सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस 

नाईक विरोधक एकवटले

दरम्यान बेलापूर मतदारसंघात जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना ऐरोलीतून गणेश नाईक यांना निवडणूक सोपी होऊ द्यायची नाही असा चंगच त्यांच्या सर्व राजकीय विरोधकांनी बांधला होता. काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे, उद्धव सेनेतील द्वारकानाथ भोईर यांच्यासह शिंदेसेनेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवक चौगुले यांच्या सतत संपर्कात होते. चौगुले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांच्यासमवेत असलेल्या माजी नगरसेवकांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतरही मुख्यमंत्री हे बंड मागे घ्यायला लावतील अशी शक्यता व्यक्त होत होती. चौगुले यांची एकंदर पार्श्वभूमी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीनंतर ते टिकाव धरतील का याविषयी साशंकता होती. असे असले तरी काहीही झाले तरी माघार घेऊ नका असा दबाव चौगुले यांच्यावर स्वपक्षातूनही होता. मुख्यमंत्र्यांकडून दबाव वाढू नये यासाठी चौगुले यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते दोन दिवसांपासून ‘नाॅट रिचेबल’ झाले होते. तुर्भ्यातील सुरेश कुलकर्णी, कोपरखैरणे येथील शिवराम पाटील यांच्यासह पक्षाचे इतर नेतेही फोन बंद करुन अज्ञातस्थळी होते. सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ सरताच या सर्व नेत्यांनी दूरध्वनी सुरू झाले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airoli vidhan sabha election 2024 independent candidate vijay chougule vs bjp ganesh naik css