तीन विकासकांना निविदा वितरित; जीव्हीके, जीएमआर आणि टाटा व्हिन्सी या कंपन्यांत स्पर्धा
डिसेंबर २०१९ पर्यंत पहिले उड्डाण करण्याच्या दृष्टीने सिडकोने नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विनंती प्रस्ताव निविदा स्पर्धेतील तीन विकासकांना सोमवारी वितरित केल्या. त्यामुळे जीव्हीके. जीएमआर आणि टाटा व्हिन्सी हे तीन विकासक आपला आर्थिक देकार दोन महिन्यांत सिडकोला कळविणार असून जुलै महिन्यात या तीन विकासकांपैकी एका विकासकाची निवड निश्चित केली जाणार आहे. पनवेल तालुक्यातील देशातील सर्वात मोठय़ा ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकासपूर्व कामांना यापूर्वीच सुरुवात झालेली आहे.
मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहत आहे. दोन हजार २६८ हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेली वीस वर्षे केवळ चर्चा सुरू होती. भराव, टेकडी कपातसारख्या दीड हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांना गतवर्षी सुरुवात झाली आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या एक हजार १६० हेक्टर या मुख्य जमिनीचा ताबा सिडकोकडे असताना जवळच्या दहा गावांतील ५७१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, पॅकेज, केंद्रीय परवानग्या, निविदा मसुदा असे सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर आता आर्थिक निविदा प्रक्रिया स्वीकारण्याची प्रक्रिया शिल्लक राहिली आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मागील तीन वर्षे या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून ही प्रक्रिया अंतिम टप्यात आणून ठेवली आहे. विद्यमान व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या प्रकल्पाच्या निविदा विकासकांना देण्यात अधिक वेळ न दवडता सोमवारी जीव्हीके, जीएमआर आणि टाट व्हिन्सी या तीन विकासकांना आर्थिक विनंती प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यामुळे पुढील ६० दिवस हे विकासक या निविदेचा सखोल अभ्यास करून निविदा सिडकोला सादर करणार आहेत. एकूण १४ हजार ५७३ कोटी रुपये खर्चाचे हे काम खासगी व सरकारी सहभागातून पूर्ण होणार आहे. स्पर्धेत टिकून राहिलेल्या जीव्हीकेला मुंबई विमानतळ नूतनीकरण व जीएमआरला दिल्ली विमानतळ नूतनीकरणाचा अनुभव आहे. टाटा रियल्टीने फ्रान्समधील व्हिन्सी बांधकाम कपंनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या तीन विकासकांपैकी कोणाला काम मिळते याकडे सर्वाचे लक्ष आहे. मुंबई विमानतळ नूतनीकरण करणाऱ्या जीव्हीकेला स्पर्धेतील अधिकतम देकार देणाऱ्या विकासकाच्या दहा टक्के आसपास देकार राहिल्यास काम करण्याची संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा