Heat Stroke Death in Mumbai Maharashtra: नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. अजूनही नवी मुंबई आणि आसपासच्या रुग्णालयांमध्ये अनेकजण उपचार घेत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी रात्री उशीरा जखमींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
एकीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून कार्यक्रम भर दुपारी घेण्यात आला, अशी टीका केली असताना अजित पवार यांनी मात्र, सर्वात आधी जखमींवर व्यवस्थित उपचार आणि मृतांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार या गोष्टी पार पडायला हव्यात, त्यानंतर यात कोण दोषी होतं वगैरे तपासता येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “एकूण ८ जण उपचार घेत आहेत. दोघं आयसीयूत व्हेंटिलेटरवर आहेत. त्यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“मृतांचा योग्य आकडा समोर यायला हवा”
“महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की करोनाचा कोणताही आकडा लपवायचा नाही. जे घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आत्ता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डीवायपाटील, टाटा रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्ण आहेत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“आधी संख्या खूप मोठी होती. नंतर अफवा सुरू झाल्या. कुणी म्हणत होतं २०पर्यंत आकडा गेलाय. काही म्हणत होते शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही तिथे महिला-पुरुषांशी बोललो, तेव्हा बहुतेकजण रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, पुण्यातील लोणावळा या भागातले दिसले. त्यांनी सांगितलं की आमच्या पोटात काहीच नव्हतं. काही म्हणाले आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्रता अतिशय जास्त होती. कार्यक्रम संपल्यानंतर थोडी चेंगराचेंगरी झाल्याचंही काहीजण सांगतायत. काहींना नंतर काय झालं माहिती नाही. दवाखान्यात आणल्यानंतरच त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
“…हेच आयोजकांचं चुकलं आहे”
“लोणावळ्याची भगिनी भेटली. आम्ही विचारलं कुणी गाडी पाठवली होती. ते म्हणाले माहिती नाही. तीन-चार गाड्या आल्या होत्या. आम्ही त्यात बसलो आणि कार्यक्रमाला आलो. काहीजण १५ तारखेला रात्री इथे आले होते. मी त्यांना विचारलं आंघोळी वगैरे केल्यात का? तर ते म्हणाले नाही केल्या. गर्दी खूप होती. उन्हाची तीव्रता जास्त होती. खरंतर कार्यक्रमाची वेळ उन्हाळ्यात भर दुपारची निवडणं हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. आपल्यातले निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही डॉक्टरांना सांगितलंय की औषधपाण्याचा खर्च त्यांच्याकडून घेऊ नका. मुख्यमंत्र्यांनीही तो खर्च करणार असं सांगितलं आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यक्रमाच्या वेळेवर आक्षेप घेतला आहे.
“मुळात त्यांची वेळ चुकली. वेळ संध्याकाळची असती, तर अधिक योग्य झालं असतं. कारण संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी राहाते. एप्रिल-मेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत. आप्पासाहेब धर्माधिकारींना मानणाना वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने लोक येतात. ती काळजी घ्यायला हवी होती”, असंही ते म्हणाले.
उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?
“आधी जखमींवर उपचार आणि मृतांवर अंत्यसंस्कार या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. नंतर हे का घडलं, कोण जबाबदार आहे, कुणी हलगर्जीपणा दाखवलाय, कुणी दुर्लक्ष केलं आहे, कुणी वेळ निवडली आहे या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत.आम्हाला कुणालाच यात राजकारण करायचं नाही. कुणावरच असा प्रसंग येता कामा नये. पण तो सरकारी कार्यक्रम होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. साडेतेरा-चौदा कोटींचं बजेट त्या कार्यक्रमासाठी होतं. आजपर्यंत महाराष्ट्रभूषण कार्यक्रमासाठी एवढी रक्कम दिली गेली असं झालं नव्हतं. ती दिली गेली. त्यानंतरही असं व्हायला नको होतं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.