उरण बाजारपेठेत अलिबागचा पांढरा कांदा, कैऱ्यांची आवक
उरणच्या बाजारपेठेत अलिबाग तालुक्यातील ताजी भाजी तसेच हंगामातील विविध पदार्थाची आवक होत असून या वेळी राज्यात प्रसिद्ध असलेली गुणकारी व औषधी पांढरा कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक सुरू झाली आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असताना कैऱ्या, चिंचा आणि जाम यांचीही आवक झाली आहे. पांढऱ्या कांद्याच्या माळांना उरणमध्ये मागणी वाढू लागली आहे. या माळांची किंमत आता दीडशे रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षांपेक्षा याची किंमत वाढली असली तरीही या कांद्याची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जात आहे.
अलिबागचा पांढरा कांदा हा राज्यात प्रसिद्ध आहे.पावसातील चार महिने भातशेती केली जाते. त्यानंतर याच शेतात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये या कांद्याची लागवड केली जाते. त्यामुळे साधारणत: फेब्रुवारी ते मार्चपर्यंत हा कांदा तयार होतो. वडखळ नाका तसेच अलिबाग येथे आलेला प्रत्येक माणूस या पांढऱ्या कांद्याच्या खरेदीविना आपल्या गावी जात नाही. अलिबाग तालुक्यातील खंडाळा, ऊसर, चौल, बहिरोके, कार्ले, वामनगाव, सोरगाव आदी परिसरात या कांद्याचे पीक घेतले जाते. विशिष्ट पद्धतीने या कांद्याचे उत्पादन घेऊन पेंढय़ाच्या पिळलेल्या दोरीमध्ये १२० ते १५० पर्यंतच्या कांद्याची माळ विणली जाते. त्यामुळे कांद्याची माळ हेसुद्धा या कांद्याचे वैशिष्टय़े आहे. या कांद्याच्या लागवडीनंतर पाणी मोठय़ा प्रमाणावर लागते त्यामुळे लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत वाढ झाल्याचे मत अनिता पाटील या कांदा विक्रेत्या महिलेने व्यक्त केले आहे. तसेच कांद्याच्या जोडीला अलिबागमधील कैऱ्या, चिंचांचीही विक्री केली जाते. त्यानंतर जांभळे, करवंदे आदी रानमेवेही अलिबागमधून आणून उरणच्या बाजारात विकले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा