लोकसत्ता टीम
पनवेल : करंजाडे वसाहतीच्या रहिवाशांनी मंगळवारी पिण्याचे पाणी मुबलक मिळावे यासाठी मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व करंजाडे पिपल्स फाऊंडेशन या संस्थेने केले होते. मोर्चा दरम्यान या संस्थेचे पदाधिकारी विनोद साबळे यांनी महायुतीचे खा. श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या मतदानाच्या प्रचारावेळी ‘पाणी प्रश्न सोडून बोला, असे वक्तव्य केल्याची आठवण करत खा. बारणे यांच्यावर टिका केली होती. मात्र बुधवारी साबळे यांच्या या टिकेला खा. बारणे यांनी प्रतिउत्तर दिल्याने पाण्याच्या मोर्चानंतर करंजाडेवासियांचा पाणी प्रश्नावर पनवेलमधील राजकारण तापल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विनोद साबळे हे रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे एक नेते आहेत. साबळे यांनी लोकसभेच्या निवडणूकीत मनोज जरांगे यांच्या सूचनेनंतर महायुतीचे उमेदवार खा. बारणे यांच्या विरोधात प्रचार सूरु केला होता. मंगळवारच्या पिण्याच्या पाण्यासाठी काढलेल्या करंजाडेतील मोर्चात सुद्धा विनोद साबळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना खा. बारणे यांनी केलेल्या पाण्याच्या विधानाविषयी आठवण करुन दिली. विविध समाजमाध्यमांवर विनोद साबळे यांच्या टिकेची चित्रफीत झळकल्यानंतर बुधवारी खा. बारणे यांनी साबळे यांना प्रतिउत्तर दिले.
आणखी वाचा-राज्याची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना – नाना पटोले
खा. बारणे म्हणाले, की काही अपप्रवृत्ती अशा चुकीच्या पद्धतीने नागरीकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून मी असे बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण खा. बारणे यांनी दिले. जे चुकीचा प्रचार करतात त्यांच्याकडे असा कोणता पुरावा असल्यास त्यांनी तो जनतेपुढे मांडावा असेही खा. बारणे म्हणाले. बारणे यांनी दिलेल्या माहितीनूसार आ. महेश बालदी यांनी सुद्धा करंजाडेवासियांच्या पाण्यासाठी वेळोवेळी सिडको मंडळासोबत बैठका घेतल्या असून राज्यात, केंद्रात महायुतीचे सरकार असल्याने करंजाडेवासियांचा पाणी प्रश्न नक्की सोडवला जाईल असेही खा. बाऱणे म्हणाले.