नवी मुंबई: उलवा येथील एका रिक्षा चालकाच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील फिर्यादीने मद्यपान करीत याच रिक्षा चालकाच्या रिक्षाला ठोस मारल्याचा गुन्हा डिसेंबर मध्ये दाखल आहे. एनआरआय पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहेत.
यातील फिर्यादी अशोक थोरात हा स्कुल बस चालक आहे. १३ डिसेंबरला उलवा परिसरातील आयएमएस शाळेची बस तो विद्यार्थ्यांना आणण्यास घेऊन जात होता. मात्र तो आजारी असूनही गाडी चालवत असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका रिक्षाला धडक दिली. त्यावेळी रिक्षा चालक सुरेंद्र ठाकूर याने जातीवाचक शिवीगाळ करीत शूटिंग केले. त्यावेळी रिक्षा चालक नक्की कोण हे थोरात यांना माहिती नव्हते. कालांतराने त्या रिक्षा चालकाची माहिती मिळाल्यावर त्यांनी या बाबत एनआरआय पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून तक्रार दिली. याची दखल घेत एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पार्श्वभूमी
१३ डिसेंबरला स्कुल बस आणि रिक्षा यांच्यात जो अपघात झाला होता. त्यावेळी बस चालक अशोक थोरात यांच्या विरोधात मद्यपान करून गाडी चालवण्याचा गुन्हा नोंद झाला होता. मद्यधुंद अवस्थेत चालकाच्या जागेवर बसलेल्या थोरात याचे फुटेज हि व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे वैद्यकीय अहवालात त्याने मद्य प्राशन केल्याचे समोर आलेले आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.