पनवेत : पनवेलमध्ये लेडीज सर्व्हीसबार चालतात. ते मध्यरात्री व पहाटेपर्यंत सूरु असतात. सध्या पनवेलचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे हे सुद्धा रात्रीच्या वेळी बार आणि विविध गैरधंद्यांवर जोरदार कारवाई करत आहेत. मात्र एका कथित पत्रकाराने कळंबोली पोलीसांची झोप उडवली आहे. या पत्रकाराने नऊ दिवसांपूर्वी एका रात्रीत सूमारे १० वेळा पोलीस ठाण्यात दूरध्वनी करुन तानसा या लेडीज सर्व्हीसबारमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची तक्रार केली. पोलिसांचे पथक त्या हॉेटेलमध्ये कारवाईसाठी गेल्यावर तिथे तसे काहीच सूरु नसल्याचे समजले.
पुन्हा कारवाईसाठी गेलेले पथक पोलीस ठाण्यात परत आल्यावर पुन्हा या कथित पत्रकाराचा फोन पोलीस ठाण्यात यायचा. एका रात्रीत सूमारे १० वेळा फोन केल्याने रात्री साडेदहा वाजता बार बंद झाल्यावर पोलीस याच पत्रकाराची नेमकी तक्रार काय यासाठी पोलिसांनीच त्याला बारच्या बाहेर बोलावले. मात्र संतापलेला कथित पत्रकार तिकडे आलाच नाही. अखेर पत्रकाराला फोन केल्यावर त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना शिवीगाळ केली. ही सर्व घटना नऊ दिवसांपूर्वी म्हणजेच (ता.21) घडली. या शिविगाळ विषयी समाजमाध्यमांमध्ये ध्वनीफीत पसरल्यावर पोलिसांनी अखेर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा नोंद करुन त्याचा तपास सुरु केला.
हेही वाचा: चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
पनवेलमध्ये १५पेक्षा अधिक लेडीज सर्व्हीस बार आहेत. या बारमध्ये मध्यरात्री व पहाटेपर्यंत धुडगुसू सूरु असतो. सध्या पोलीस उपायुक्तांनी नव्याने पदभार स्वीकारल्याने त्यांनी ही रात्रसंस्कृती बंद करण्यासाठी रात्री उशीरा व पहाटेपर्यंत चालणा-या गोल्डन नाईट व कपल या दोन बारवर धाड घातली. त्यामुळे सर्व बारमालकांचे धाबे दणाणले. पोलीस उपायुक्त डहाणे यांनी नुसते लेडीजबारच नव्हे तर सळईचोरी करणारे, जुगाराचे अड्डे चालविणारे, एलपीजी टँकरमधून घरगुती सिलेंडरमध्ये गॅस चोरी करणारे, देशी- गावठी व विदेशी मद्याची अवैध विक्री करणा-यांवर जोरदार कारवाई केली. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांनाच ही कारवाई करायला पोलीस उपायुक्तांनी भाग पाडले. तरीही कळंबोली येथील तानसा बारमध्ये महिला वेटर वेशाव्यवसाय करत असल्याची तक्रार रात्रपाळी करणा-या पत्रकाराने पोलिसांकडे करुन पोलीसांची झोप उडवली.
या पत्रकाराने यापूर्वीही तानसा बारमालकाकडून गुगल पे द्वारे खंडणी उकळल्याची तक्रार बारमालकाने पोलिसांत केली आहे. फोनवरील रात्रपाळी करणारा कथित पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांच्यातील संभाषणादरम्यान संबंधित पोलीस अधिकारी व त्या पत्रकाराची बाचाबाची झाली. त्या रात्रपाळी करणा-या पत्रकाराने त्याच्या वरिष्ठांशी बोला असे पोलीस अधिका-याला सूचविले. त्यानंतर वरिष्ठ कथित पत्रकाराने पोलीस अधिका-यांना आम्ही करदाते असल्याचे सांगत, लेडीज सर्व्हीस बारमध्ये जाऊन कारवाई करण्याच्या अधिकारापासून ते भारतीय दंड संहितेविषयी पोलीसांना तोकडी माहिती असून पोलिसांची उलटतपासणी घेतली. एवढ्यावरच हे संभाषण थांबले नाही तर कथित वरिष्ठ पत्रकाराची जीभ संभाषणा दरम्यान घसरली.
अवार्च्य भाषेत त्याने पोलीस अधिका-याला व पोलीस खात्यालाच शिवीगाळ केली. या शिवीगाळाची ध्वनीफीत त्या कथित पत्रकाराने समाजमाध्यमांवर पसरवून पोलिसांची बदनामी केली. अखेर नऊ दिवसांनी पोलिसांनी सोमवारी रात्री पोलीस व पत्रकाराच्या संभाषणाच्या ध्वनीफीतीच्या आधारे कथीत पत्रकारा विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीसांच्या हाती कथित पत्रकारापर्यंत पोहचण्यासाठी अवघा मोबाईल नंबर हा एवढाच पुरावा आहे. मात्र पोलिसांची झोप उडवणारा तो कथित पत्रकार व त्याचा वरिष्ठ पत्रकार याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.