पनवेल : सिडको महामंडळ नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत महागृहनिर्माणातून हजारो सदनिका बांधत असल्याने या घरांची सोडत सिडको कधी काढणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले असताना सिडको मंडळाने मंगळवारी रात्री कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे यापूर्वी बांधलेल्या गृहसंकुलामध्ये बांधून पूर्ण असलेल्या उपलब्ध ९०२ सदनिकांची गृहविक्रीची सोडत कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर (२७ ऑगस्ट) काढणार असल्याचे जाहीर केले.
या सोडतीमध्ये नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता ३८ व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता १७५ असे २१३ सदनिका आणि खारघर येथे सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती व वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत होणार असल्याची माहिती सिडकोने दिली.
हेही वाचा >>>ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा पुढील सात महिन्यांत सुरू होत असून नवी मुंबई मेट्रो, अटल सेतू महामार्ग हे सुरू झाल्याने सिडको परिसराला दळणवळणाची नवी गती मिळाली आहे. सर्वाधिक गतिमान शहर असणाऱ्या सिडको परिसरात स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी अनेक गुंतवणूकदार प्रयत्नशील असतात. सिडकोच्या या सोडतीमध्ये हेच भाग्यवान नशीब आजमावणार आहेत. खारघर येथील सदनिकांच्या सोडतीमध्ये टूबीएचके घर असल्याने सिडकोने ठरविलेल्या सरकारी दरात नागरिकांना हे घर मिळण्याची संधी असणार आहे.