नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत आणि बस आगारांच्या जागांवर सिडको महामंडळ महागृहनिर्माण उभारत असून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर शेकडो घरांची सोडत सिडको काढणार असल्याचे जाहीर केल्याने ऑक्टोबर महिन्यात सिडकोच्या घरांसाठी ग्राहकांची झुंबड उडणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागू होण्यापूर्वी ही सोडत निघण्यासाठी सिडकोत हालचाली सुरू आहेत. या सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती खासगी विकासकांपेक्षा कमी असल्याने मोठ्या प्रमाणात सिडकोकडे या सोडतीमधून महसूल जमा होण्याची शक्यता आहे.

सिडको मंडळ सध्या ६७ हजार सदनिका बांधत असून त्यापैकी ४० हजार सदनिकांच्या महानिर्माणाचे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे सूतोवाच नूकतेच सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे. या घरांच्या इमारतींचे बांधकाम नवी मुंबईतील बस आगार व अवजड वाहनतळ, रेल्वे स्थानकांचे फोरकोर्ट परिसरात सुरू आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधीं मिळेल या उद्देशाने ही घरे सिडको मंडळ बांधत आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अपघाताची शक्यता

नवी मुंबईतील खांदेश्वर, मानसरोवर, खारघर व इतर रेल्वे स्थानकांपासून हाकेच्या अंतरावर या सदनिका उंच इमारतींमध्ये उपलब्ध होणार आहेत. दरवेळेपेक्षा या वेळी ग्राहकांना त्यांची सदनिका, इमारत व मजला निवडण्याची संधी सिडकोने ऑनलाइन सोडतीमध्ये ठेवल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सदनिका व मजला निवडता येणार आहे. सिडको मंडळाच्या सदनिका विक्रीच्या सोडत पद्धतीत पहिल्यांदा अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात येणार आहे. परंतु अजूनही सर्व महागृहनिर्माण योजनांमधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने दोन टप्प्यांत सिडको ही सोडत काढणार आहे.